नितीश कुमार थोड्याच वेळात घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

बिहारमध्ये एनडीएच्या पुनरागमनाचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. आज संध्याकाळी ५ वाजता नितीश कुमार एनडीए सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तसेच आणखी आठ मंत्री मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांमध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचा मुलगा संतोष कुमार यांच्या नावाचाही समावेश आहे.

राजभवनाच्या राजेंद्र मंडपात संध्याकाळी ५ वाजता शपथविधी सोहळा आयोजित केला जाईल, ज्यामध्ये नितीश कुमार नवव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. राजभवनात सायंकाळी ५ वाजता शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्रिपदाव्यतिरिक्त भाजप प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा आणि प्रेम कुमार यांची शपथ घेण्याची शक्यता आहे.

याशिवाय श्रवण कुमार, विजेंद्र यादव, जेडीयू कोट्यातून विजय चौधरी, हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे संतोष सुमन आणि अपक्ष आमदार सुमित सिंह हे मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवानही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

तत्पूर्वी नितीश कुमार यांनी राजभवन गाठून राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. यावेळी नितीश यांनी भाजप आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाच्या पाठिंब्याची पत्रेही दिली.