नितेश राणेंचा मनोज जरांगेंना थेट इशारा; काय म्हणाले होते जरांगे?

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच शहाणं व्हावं, नाही तर मी सगळं बाहेर काढणार, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी लातूर येथे बोलताना केलं होतं. दरम्यान,  मनोज जरांगे पाटील  यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी निशाणा साधला असून, मनोज जरांगेंच्या विरोधात भाजप नेते आक्रमक होताना पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले नितेश राणे?
“मनोज जरांगे पाटलांना पहिल्या दिवशीच स्पष्ट केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जर तुम्ही टीका कराल, तर आम्ही कधीही हे सहन करणार नाही. त्यामुळे आम्हाला देखील तुमच्या डोक्यात विष कोण टाकतोय, तुमची भाषणं कोण लिहून देतोय, तुमच्या तोंडातून मुस्लिम आरक्षणाची भाषा कोण बोलायला लावतोय याची आम्हाला पुराव्यासहित यादी काढावी लागेल.

मराठा आरक्षणाबद्दल बोलत रहाल तर आम्ही तुमचं स्वागतच करू. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला टिकणारा आरक्षण दिलं, असंख्य मराठा समाजासाठी योजना जाहीर केल्या. त्यामुळे त्यांच्याविरोधात जर तुम्ही भूमिका घ्यायला सुरू कराल, तर गाठ या मराठ्यांशी आहे हे लक्षात राहू द्या, असा इशारा राणे यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते जरांगे?
लातूर येथे बोलतांना जरांगे म्हणाले होते की, “देवेंद्र फडणवीसांनी आताच शहाणं व्हावं नाही तर मी सगळं बाहेर काढणार. मीच घडवून आणतोय हे त्यांनी उघडपणे सांगावं. त्यांनी आधी मोठेपणा दाखवला होता. त्यांनी आता खोड्या करायला सुरुवात केली आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

फडणवीसांनी आता स्वत:च्या माणसांना बोलायला सांगितलं आहे. फडणवीसांच्या ताटात जेवणारी माणसं बरळायला लागली आहेत. कुणी कितीही जातीयवाद केला तरी ओबीसी मराठा एकत्र आहे, असे देखील,”जरांगे म्हणाले होते.