बंगळुरु : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मुलगी परकला वांगमयीचा अत्यंत छोटेखानी समारंभात लग्नसोहळा पार पडला. विशेष म्हणजे या लग्नात राजकीय पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. या लग्न सोहळ्यात फक्त कुटुंबातील सदस्यच सहभागी झाले होते. निर्मला सीतारामन यांची मुलगी पेशाने पत्रकार असून तिने अनेक माध्यम संस्थांमध्ये काम केले आहे. सीतारामन यांच्या जावाईंचे नाव प्रतीक दोशी असून ते मोदींचे खास म्हणून ओळखले जातात.
निर्मला सीतारामन यांच्या मुलीचा लग्नसोहळा गुजरातच्या प्रतीकशी हिंदू परंपरेनुसार उडुपी अदमारू मठाच्या संतांच्या आशीर्वादाने झाला. या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही ब्राह्मण परकला वांगमयी आणि प्रतीक यांचे वैदिक मंत्रोच्चार करून लग्न लावत आहेत. जवळच अर्थमंत्री निर्मला सीतारामन उभ्या आहेत.
गुजरातचे रहिवासी प्रतीक दोशी पंतप्रधान कार्यालयात विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून काम करतात. २०१४ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी प्रथम पंतप्रधान बनले होते, तेव्हा प्रतीक दिल्लीला गेले आणि जून २०१९ मध्ये त्यांना सहसचिव पदावर बढती मिळाली. सिंगापूर मॅनेजमेंट स्कूलमधून प्रतीक दोशीने पदवी शिक्षण पूर्ण केले असून मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना दोशीने यापूर्वी गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयात संशोधन सहाय्यक म्हणून काम केले आहे. पीएमोच्या वेबसाइटनुसार, प्रतीक दोशी हे पीएमओच्या रिसर्च अँड स्ट्रॅटेजी विंगमध्ये काम करतात.
निर्मला सीतारामन यांची मुलगी परकला वांगमयीने राष्ट्रीय वृत्तपत्रात काम केले असून दिल्ली विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तसेच तिने नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या मेडिल स्कूल ऑफ जर्नलिझममधून पत्रकारितेचे शिक्षणही घेतले आहे. दुसरीकडे, निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर एक राजकीय अर्थशास्त्रज्ञ आहेत, ते संप्रेषण सल्लागार आहेत. जुलै २०१४ ते जून २०१८ दरम्यान त्यांनी आंध्र प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट पदही भूषवले आहे.