नागपूर : एकीकडे लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून देशभराचे लक्ष लागलेली निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे
नागपूरमधील रामटेक विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते गज्जू यादव यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर गज्जू यादव हे आता भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
गज्जू यादव हे 2019 मध्ये रामटेकमधून काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार होते. आता निवडणुकी तोंडावर गज्जू यादव यांनी राजीनामा दिल्यामुळे पक्षासाठी रामटेकमध्ये मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान यापूर्वी देखील अनेक नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला तर दुसरीकडे मिलींद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता गज्जू यादव यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, ते पुढे काय भूमिका घेणार हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र ते भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.