नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भारतीय निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बाँड्सचे तपशील जाहीर केले आहेत. SBI कडून मिळालेल्या डेटाची यादी निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईटवर अपलोड केली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड केलेल्या माहितीनुसार, तीन श्रेणीतील इलेक्टोरल बाँड्स खरेदी करण्यात आले आहेत – 1 लाख रुपये, 10 लाख रुपये आणि 1 कोटी रुपये. मात्र, याच्या आधारे कोणत्या कंपनीने कोणत्या पक्षाला देणगी दिली हे स्पष्ट झालेले नाही. सर्वात मोठ्या देणगीदारांबद्दल जाणून घेऊया-
देणगीदारांच्या यादीत, फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेसने सर्वाधिक 1,368 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2019 पासून खरेदी केलेल्या एकूण निवडणूक रोख्यांपैकी निम्मी रक्कम 23 कंपन्यांची आहे.
राजकीय पक्षांना देणगी देण्यात मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कंपनीने इलेक्टोरल बाँड्सद्वारे 966 कोटी रुपये दिले आहेत. ही कंपनी शेअर बाजारात सूचिबद्धही नाही. ही कंपनी कृष्णा रेड्डी चालवतात. ही कंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेकची प्रवर्तक आहे.
क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड हे इलेक्टोरल बाँड देणाऱ्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 410 कोटी रुपये दिले आहेत. यानंतर चौथा क्रमांक वेदांत लिमिटेडचा आहे. या कंपनीचे संस्थापक अनिल अग्रवाल असून कंपनीने 400 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
पाचव्या क्रमांकावर, हल्दिया एनर्जी लिमिटेडने 377 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे दिले आहेत. यामध्ये सहाव्या क्रमांकावर असलेल्या भारती ग्रुपने राजकीय पक्षांना इलेक्टोरल बाँड्सच्या स्वरूपात २४७ कोटी रुपये दिले आहेत.
सर्वाधिक देणगीदारांच्या यादीत सातव्या स्थानावर असलेल्या एस्सेल मायनिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेडने 224 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तसेच वेस्टर्न यूपी पॉवर ट्रान्समिशनने 220 कोटी रुपयांची देणगी दिली असून ही कंपनी आठव्या क्रमांकावर आहे.
Keventer Foodpark Infra Limited Rs 194 कोटींसह नवव्या स्थानावर आणि मदनलाल लिमिटेड Rs 185 कोटींच्या निवडणूक देणग्यांसह दहाव्या स्थानावर आहे.