नवी दिल्ली । २०२४ लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज निवडणूक आयोग दुपारी ३ नंतर पत्रकार परिषदेत जाहीर करणार असून तारखा जाहीर होण्याआधीच शुक्रवारी उशीरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना पत्र लिहिलं आहे.
नेमकं काय लिहिलंय आहे पत्रात ?
पंतप्रधान मोदींनी पत्राच्या सुरुवातीला म्हटलं की, ‘माझे सर्व कौटुंबीक सदस्यांनो, आपल्या नात्याला एक दशक पूर्ण होत आहे. १४० कोटी भारतीयांनी विश्वास आणि पाठिंबा दिला. यामुळे लोकांच्या जीवनात परिवर्तन झालं आहे. गेल्या १० वर्षातील हे सर्वात मोठं यश आहे. गरीब, शेतकरी, युवक आणि महिलांच्या जीवनात सुधारणा आणण्यासाठी सरकारने प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत’.
‘पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून पक्के घर, वीज, पाणी आणि एलपीजी गॅस पोहोचला. आयुष्य भारताच्या माध्यमातून आजारांवर उपचार, शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य, मातृ वंदना योजनेच्या माध्यमातून महिलांना सहाय्य मिळालं आहे, असं मोदींनी म्हटलं. देश ज्या संकल्पाने पुढे जात आहे तो पूर्ण करण्यासाठी मला तुमच्या विचारांची, सूचनांची आणि सहकार्याची नक्कीच गरज आहे असं मोदींनी म्हटलं.
‘आपला देश परंपरा आणि आधुनिकता हे दोन्ही घेऊन पुढे जात आहे. मागील दहा वर्षात पुढील पीढीसाठी पायाभूत सुविधांचा पाया रचला. आपल्या राष्ट्र आणि सांस्कृतिक वारशातही मोठा बदल झाला. तुमचा विश्वास आणि पाठिंब्यामुळे जीएसटी लागू केली, कलम ३७० हटवलं, तिहेरी तलाकवर नवा कायदा आणला, नारी शक्ती वंदन कायदा, संसद भवनाचं उद्घाटन , दहशतवादी आणि नक्षलवाद्यांच्या विरोधात कठोर निर्णय घेतले’, असं त्यांनी पुढे सांगितलं.