चोपडा : लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पडावी यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण ६ मे सोमवार रोजी महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ सुरेश जी पाटील महाविद्यालयात दोन सत्रात पार पडले. निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एकूण १५०५ कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण व्यवस्था करण्यात आली होती. यापैकी १४७४ कर्मचाऱ्यांना यावेळी प्रशिक्षण देण्यात आले.
सदर प्रशिक्षणास सहा. निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे, निवडणूक प्रशिक्षक नरेंद्र सोनवणे, नायब तहसीलदार आर आर महाजन आदींच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले. तहसीलदार भाऊसाहेब थोरात आणि केंद्रप्रमुख, प्रशिक्षक नरेंद्र सोनवणे यांनी सकाळी ८ ते ११ च्या सत्रात पिपिटी द्वारे सविस्तर माहिती दिली. सकाळी११ ते दुपारी १ वाजे पर्यंत ७५१ कर्मचाऱ्यांनी इव्हीएम मशीन व बॅलेट युनिट प्रशिक्षण घेतले.
प्रत्येकाला एव्हीएम हाताळणी करता यावी यासाठी ईव्हीएम हाताळणी सत्र घेऊन प्रत्येकाचा सराव करून घेण्यात आला. आवश्यक प्रपत्रे अचूकपणे भरण्याचा सराव देखील करून घेण्यात आला. नंतर प्रश्न उत्तरे घेण्यात आले. सराव प्रश्नसंच सोडविण्यात आले.
दुपारच्या सत्रात दुपारी २ ते ६ पर्यंत ७२३ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. यावेळी प्रशिक्षणानंतर सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन हाताळणी प्रात्यक्षिक करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
निवडणुकीत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या साठी टपाली मतदानाचा अधिकार मिळावा याकरता सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.प्रशिक्षण यशस्वीतेसाठी सर्वच क्षेत्रीय अधिकारी, झोनल अधिकारी, नोडल अधिकारी, नियुक्त कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.