निसर्गाच्या लहरीपणाचा अवकाळी फटका…

वेध

– नितीन शिरसाट

निसर्गाची करणी आणि नारळात पाणी, असे आपण म्हणतो. गेल्या 10 वर्षांपासूनअवकाळी पावसाच्या लहरीपणाचा शेती पिकांना फटका बसत असून शेती पिके, फळबाग, भाजीपाला यासह घरांची पडझड, अंगावर वीज पडून मनुष्य व जनावरांचा मृत्यू ही मालिका सातत्याने सुरू आहे. पर्यावरण, निसर्गप्रेमी या ऋतुमानाच्या बदलास मानवनिर्मित दररोज होणारे प्रदूषण, शहरात महानगरात सिमेंटची घरे, रस्ते, वृक्षांची कत्तल आदी कारणीभूत असल्याचे सांगतात. त्यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार गांभीर्याने दखल घेऊन वृक्ष लागवड, अभयारण्यात सुरक्षा, जंगलतोडीवर बंदी असे उपक‘म राबवित आहे.

हवामानाचा अंदाज म्हणजे एखाद्या स्थानासाठी आणि वेळेसाठी वातावरणाची परिस्थिती सांगण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करणे. लोकांनी हजार वर्षांपासून अनौपचारिकरीत्या हवामानाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु 19 व्या शतकापासून विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून औपचारिकरीत्या हवामानाचा अंदाज लोक लावायला लागले. हवामानाचा अंदाज एखाद्या निश्चित ठिकाणी असलेल्या वातावरणाच्या सद्यस्थितीबद्दल परिमाणात्मक माहिती गोळा करून आणि वातावरण कसे बदलेल हे दाखविण्यासाठी हवामानशास्त्र वापरून केले जाते. आता हेच काम संगणकामुळे अधिक सोपे झाले आहे. आपल्या मातृभूमीसाठी अन्नधान्य पिकविणारा, धरतीला सुजलाम् सुफलाम् करणारा शेतकरी हा आपला अन्नदाता अवकाळी पाऊस, गारपीट, वादळवार्‍याची पर्वा न करता वर्षभर बारमाही शेती पिके, फळबाग, भाजीपाला लागवड करतो आहे.

अतिवृष्टीने खचून जाणार्‍या शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने सततचा पाऊस अतिवृष्टी नैसर्गिक आपत्ती घोषित करून शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान बदलाचा अंदाज देणारे परभणी येथील हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तविलेला अंदाज आता तंतोतंत खरा ठरत आहे. 6 ते 8 एप्रिलपर्यंत राज्यात पाऊस कोसळणार असल्याचा त्यांचा अंदाज खरा ठरला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण भागांत अवकाळी पाऊस वीज-गारांसह पडणार असल्याचाही अंदाज वर्तविला होता. तोही अंदाज खरा ठरला.

पश्चिम विदर्भातील अकोला, वाशीम, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ तसेच मराठवाडात नगर, पारनेर, लातूर, हिंगोली, बीड, धुळे, परभणी, कोकणातील सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर यासह राज्यात पावसाने प्रचंड पिकांची नासाडी केली. या गारपीट-पावसाने गहू, मका, कांदा, हरभरा, आंबा, पपई, लिंबू, टरबूज, संत्रा यासह भाजीपाला पिकांना नुकसानीची झळ सोसावी लागली. वीज पडून दोन दिवसांत सहा जणांचा मृत्यू, शेकडो घरांची पडझड, शेळ्या-मेंढ्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे पश्चिम आणि पूर्व विदर्भाला चांगलाच फटका बसला. अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. मध्यरात्रीपासून सुरू असलेला पाऊस अजूनही कायम आहे. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर आदी अनेक ठिकाणी पावसासह वादळाचा तडाखा बसला.

याआधीअवकाळी पावसामुळे राज्यातील 13 हजार 729 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिली होती. राज्यात आठ जिल्ह्यात या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. यापुढे राज्य शासनामार्फत घोषित करण्यात आलेल्या अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीकरितादेखील 24 तासांमध्ये 65 मि. मी.पेक्षा जास्त पाऊस हा निकष कायम ठेवून याबरोबरच सततच्या पावसाकरिता निकष शेती पिकांच्या नुकसानीकरिता लागू करण्यात येणार आहे. दुष्काळाव्यतिरिक्त इतर सर्व नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठीदेखील हा निकष लागू राहील. या निर्णयामुळे शेतकर्‍यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.

– 9881717828