Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील मंगळवारी ११ व्या दिवसाचे खेळ खेळले जात आहेत. आता मंगळवारी भारताचं सर्वात मोठं आशास्थान असलेला नीरज चोप्रा मैदानात उतरला आहे. मंगळवारी पुरुषांच्या भालाफेकीची क्वालिफायर्स खेळवण्यात आली.
या क्वालिफायर्समध्ये भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा समावेश बी ग्रुपमध्ये करण्यात आला होता. या ग्रुपमध्ये त्यानेच सर्वात पहिल्यांदा भाला फेकला. यावेळी त्याने पहिल्याच प्रयत्नात तब्बल ८९.३४ मीटर अंतरावर भाला फेकला आणि अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. विशेष म्हणजे याआधी झालेल्या ए ग्रुपमधील क्वालिफायर्समधील १६ खेळाडूंपेक्षाही नीरजचे अंतर सर्वोत्तम ठरले आहे. ए ग्रुपमध्ये अव्वल क्रमांकावर जर्मनीचा ज्युलियन वेबर राहिला होता. त्याने ८७.७६ मीटर भाला फेकला होता.
दरम्यान, अ ग्रुपमध्ये भारताचा किशोर जेना होता. मात्र तो या ग्रुपमध्ये ९ व्या क्रमांकावर राहिला. त्याने सर्वोत्तम ८०.७३ मीटर भाला फेकला. त्यामुळे त्याचं या स्पर्धेतील आव्हान संपले. त्यानेही ही भालाफेक पहिल्या प्रयत्नात केली होती. दुसऱ्या प्रयत्न त्याचा अपयशी ठरला.
8 ऑगस्ट रोजी अंतिम सामना
नीरज चोप्राने या मोसमात 89.34 मीटर फेक करून आपली सर्वोत्तम कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे या थ्रोमुळे तो त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम थ्रोच्या अगदी जवळ आला. नीरजची सर्वोत्तम थ्रो 89.94 मीटर आहे आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याने ज्या प्रकारे कामगिरी केली आहे ते पाहता तो अंतिम फेरीत 90 मीटरचा अडथळा पार करेल असे वाटते.