पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकदार करून पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना हरियाणा सरकारने बक्षीस रक्कम दिलीय. विशेष म्हणजे देशासाठी एकमेव रौप्यपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला मनू भाकरपेक्षा एक कोटी रुपये कमी मिळालेय.
नीरज चोप्राला मिळाले एक कोटी कमी !
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणाऱ्या मनू भाकरला हरियाणा सरकारने 5 कोटी रुपयांचे बक्षीस दिले आहे. तर नीरज चोप्राला चार कोटी रुपये दिले, जे मनू भाकरपेक्षा एक कोटी रुपये कमी आहेत. नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. त्याला अंतिम फेरीत पाकिस्तानच्या अर्शद नदीमकडून पराभव पत्करावा लागला. पण इथे मोठी गोष्ट म्हणजे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताकडून सर्वोत्तम कामगिरी नीरज चोप्राची होती. मात्र, नीरज चोप्राला मनू भाकरपेक्षा एक कोटी रुपये कमी मिळाले याचे कारण म्हणजे या महिला नेमबाजाने एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकण्याचा पराक्रम केला, जे भारतीय इतिहासात प्रथमच घडले आहे. कांस्यपदक विजेत्याला हरियाणा सरकार अडीच कोटी रुपये देते. मनूला दोन पदकांमुळे ५ कोटी रुपये मिळाले आहेत.
हरियाणाच्या या खेळाडूंवरही कोटींचा वर्षाव
हरियाणा सरकारने आणखी 2 खेळाडूंवर करोडो रुपये खर्च केले आहेत. मनू भाकरसह कांस्यपदक जिंकणाऱ्या सरबज्योत सिंगला अडीच कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. कुस्तीत कांस्यपदक जिंकणारा कुस्तीपटू अमन सेहरावत यालाही 2.50 कोटी रुपये देण्यात आले. अमनने पोर्तो रिकोच्या डेरियन क्रुझचा पराभव करून कांस्यपदक जिंकले.