तरुण भारत लाईव्ह न्यूज : राष्ट्र उभारणीप्रती असलेली कटिबद्धता दर्शवत, भारतीय लष्कराने दक्षिणी कमांडच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र, गुजरात, गोवा, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांच्या दुर्गम भागात असलेल्या 75 गावांपर्यंत पोहोचण्यासाठी 30 डिसेंबर 2022 रोजी मोठ्या प्रमाणात आऊटरिच अभियान राबविण्याचे नियोजन केले आहे. बेंगळूरू येथे येत्या 15 जानेवारी 2023 रोजी साजऱ्या होणाऱ्या 75व्या लष्कर दिन संचलनाच्या तयारीच्या दृष्टीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या मालिकेतील हा तिसरा उपक्रम आहे.
‘ग्राम सेवा-देश सेवा’ या संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाअंतर्गत, नव्याने सुरु करण्यात आलेल्या अग्निपथ योजनेसंदर्भात जागरूकता मोहिमा राबविण्यासाठी भारतीय लष्करातील कर्मचारी 75 दुर्गम खेड्यांना भेट देणार आहेत. तसेच, या भेटीदरम्यान, स्वच्छ भारत अभियानाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने लष्कराचे जवान या गावांमध्ये स्वच्छता मोहीम देखील राबविणार आहेत. तसेच हे जवान, या गावांमध्ये व्हॉलीबॉल, खो-खो आणि कबड्डी या खेळांसाठी क्रीडा सुविधा निर्माण करण्याचा देखील प्रयत्न करतील तसेच त्या भागांतील युवक आणि विद्यार्थ्यांचे मैत्रीपूर्ण सामने आयोजित करतील. तेथील वीर नारींसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी देखील भारतीय लष्कराकडून प्रयत्न करण्यात येतील. या गावांतील स्थानिक नागरिकांसोबत भोजनाचा आनंद घेणे आणि त्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत एकोप्याचा संदेश पोहोचवून या देशाविषयी आपलेपणाची भावना निर्माण करण्याची योजना देखील लष्करातील कर्मचाऱ्यांनी आखली आहे.
देशाप्रती अधिक मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याचा भाग म्हणून, भारतीय लष्कर नेहमीच देशातील गावांचे स्वास्थ्य, विकास आणि प्रगती साधण्यासाठी वचनबद्ध आहे. देशाच्या ग्रामीण भागातील लोकांना सर्वांशी जोडून घेण्यासाठी तसेच गावातील लोकांच्या जीवनाचा दर्जा उंचावून त्यांच्या चेहेऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी टाकलेले पाऊल म्हणून हा आऊटरिच कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.