धुळे : तालुक्यातील नेर येथील महामार्गावरच असलेल्या एचडीएफसी बँकेच्या एटीएमला चोरट्याने टार्गेट करीत फोडल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आल्यानंतर शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली मात्र सुदैवाने चोरट्याला कॅश ट्रे बाहेर काढता न आल्याने 53 लाखांची रोकड बचावली. या प्रकरणी धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्याचा स्थानिक गुन्हे शाखेसह तालुका पोलिसांकडून कसून शोध सुरू करण्यात आला आहे.
सुरक्षा रक्षक नसल्याची संधी पथ्थ्यावर
नेर गावातील महामार्गालगच एचडीएफसी बँकेचे गावात एकमेव एटीएम आहे. पूर्वी तीन सत्रात सुरक्षा रक्षक असल्याने 24 तास खडा पहारा होता मात्र अलीकडेच बँकेने एक सुरक्षा रक्षक कमी केल्यानंतर रात्री 11 ते सकाळी सात दरम्यान एटीएम शटर ओढून बंद केले जात असल्याची माहिती आहे. माहितगार अट्टल चोरट्याने ही बाब हेरत मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास एटीएमच्या दालनात प्रवेश करीत लोखंडी पहारीने एटीएमचा दरवाजा तोडला मात्र कॅश ट्रे पर्यंत चोरटा पोहोचू न शकल्याने त्याला काढता पाय घ्यावा लागला तर शुक्रवारी सकाळी सात वाजता सुरक्षा रक्षक आल्याने एटीएम फुटल्याची वार्ता गावात पसरली.
चोरटा सीसीटीव्हीत कैद
पोलिस प्रशासनाने सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्यात दुचाकीवरून तोंडाला रूमाल बांधलेला चोरटा आढळून आला असून दुचाकीवरील क्रमांकासह संशयीताच्या वर्णनाद्वारे चोरट्याचा कसून शोध सुरू करण्यात आला. शुक्रवारी गुड फ्रायडे, सेच दुसरा शनिवार व नंतर रविवारमुळे बँकेला सलग सुट्या आल्याने बँकेने गावातील ग्राहकांची गैरसोय टळण्यासाठी अलीकडेच या एटीएममध्ये मोठ्या प्रमाणावर रोकडचा भरणा केला होता मात्र सुदैवाने कॅश ट्रे न उघडल्याने 53 लाखांची रोकड बचावली अन्यथा बँकेचे नुकसान झाले असते हे स्पष्ट आहे.
पोलिस अधिकार्यांची धाव
अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. चोरट्याच्या शोधासाठी धुळे तालुका पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने संशयिताच्या वर्णनावरून शोध सुरू केला आहे.
अलार्म वाजलाच नाही
शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास एटीएममध्ये चोरटा शिरल्यानंतर त्याने लोखंडी पहारद्वारे एटीएमचा दरवाजा तोडला मात्र त्याचवेळी सिक्युरीटी अलार्म वाजणे अपेक्षित असताना तसे घडले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. अलार्म वाजल्यानंतर वेळीच पोलिस यंत्रणा अलर्ट होवून घटनास्थळी पोहोचली असती व आरोपीच्या मुसक्या आवळता आल्या असता, असे अधिकार्यांनी सांगितले मात्र नेरच्या घटनेत सिक्युरीटी अलार्म वाजलाच नसल्याची माहिती पोलिसांना बँक अधिकार्यांनी दिली. सुरक्षा रक्षक न नेमण्याची बेफिकिरी बँकांमध्ये वाढल्याने ही बाब चोरट्यांसाठी पर्वणी ठरत असल्याने या संदर्भातही दखल घेण्याची अपेक्षा आहे.