नोकरीच्या मागे न धावता नोकरी देणारे उद्योजक व्हावे; युवा शेतकऱ्यांना आवाहन

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची जळगाव तालुक्याची कार्यशाळा हॉटेल कोझी कॉटेजमध्ये सोमवारी आयोजित करण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी पायभूत सुविधा निधी योजनेचा लाभ घेऊन आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले.

केंद्राच्या या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी, युवा शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट, शेतकरी संस्था यांनी आपला सद्यस्थितीत असलेला कृषी व कृषी सलग्न उद्योग अथवा नवीन उद्योग सुरू करून बँक कर्ज घेतलेले असल्यास सुमारे दोन कोटीच्या कर्जास ३ टक्के व्याज परताव्याचा लाभ घ्यावा, असेही  प्रतिपादन नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले. पुढे बोलताना त्यांनी युवा शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन नोकरीच्या मागे न धावता नोकरी देणारे उद्योजक व्हावे,असे आवाहन उपस्थित युवा शेतकऱ्यांना उद्देशून केले.

यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी कृषी विभागाच्या अन्न प्रक्रिया योजनेच्या माध्यमातून लाभ घेतल्यास शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत होत आहे. शेतकऱ्यांनी शेती व शेतीपूरक व्यवसायच्या अनुषंगाने लहान उद्योग निर्मिती केल्यास रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकते, याबाबतचे मार्गदर्शन केले. याशिवाय

सदरील कार्यशाळेस नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत झांबरे व जिल्हास्तरीय कृषी पायभूत सुविधा कक्षाचे नितीन इंगळे यांनी कृषी पायभूत सुविधा निधी व त्याअंतर्गत समाविष्ट असलेले कार्यशाळेसउद्योग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व उद्योगांचे प्रकाराबाबतची माहिती दिली. तसेच कृषी पायाभूत सुविधा निधी या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या प्रकल्पांची देखील सविस्तर माहिती दिली. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रणव झा यांनी सदरील योजनेत बँकेची भूमिका व आवश्यक माहिती दिली. जिल्हा संसाधन व्यक्ती समाधान पाटील यांनी प्रधानमंत्री सुष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना व शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना करण्याबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांच्या शंकेचे निरासन केले.

यावेळी कृषी उपसंचालक सी.बी. पाटील, नोडल अधिकारी स्मार्ट तथा उपविभागीय कृषी अधिकारी अमळनेर दादाराव जाधववर, तालुका कृषी अधिकारी शिवाजी राउत, मोहीम अधिकारी विजय पवार, जिल्हास्तरीय कक्षाचे नितीन इंगळे, मंडळ कृषी अधिकारी एम.के.वाल्हे, अमित भांबरे, कृषी विभागातील अधिकारी,कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यशाळेचे सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नरेंद्र पाटील यांनी केले.