न्यूजक्लिकच्या पत्रकारांच्या घरांवर छापेमारी; मोबाईल, लॅपटॉप जप्त

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी मंगळवारी न्यूजक्लिकच्या पत्रकारांच्या घरांवर छापेमारी केली आहे. पत्रकार अभिसार शर्माने ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. चीनकडून आर्थिक मदत मिळत असल्याच्या आरोपाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
“दिल्ली पोलिस आज माझ्या घरी पोहोचले आणि माझा लॅपटॉप आणि मोबाईल फोन घेऊन गेले,” असे अभिसार शर्माने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ईडीने न्यूजक्लिकला चीनकडून आर्थिक मदत मिळत असल्याच्या आरोपाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०२१ मध्ये न्यूजक्लिकला मिळत असलेल्या बेकायदेशीर निधीबद्दल गुन्हा दाखल केला होता. न्यूजक्लिकला हा निधी चीनी कंपन्यांच्या माध्यमातून मिळत असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर ईडीने न्यूजक्लिकवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
मात्र, हायकोर्टाने न्यूजक्लिकच्या प्रवर्तकांना अटकेपासून दिलासा दिला होता. त्यानंतर आता ३ ऑक्टोबर रोजी न्यूजक्लिकच्या पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार ओनिंद्यो चक्रवर्ती, उर्मिलेश आणि अभिसार शर्मा यांना UAPA च्या कलमांखाली अटक करण्यात आली आहे.