पुणे : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विरोधकांनी एकत्र येण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण राहिल? यावरुनच विरोधकांमध्ये एकमत होत नाहीए. त्यात अनेक नेते पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव देखील अनेकवेळा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले आहे. आता २०२४ मध्ये शरद पवार पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असणार का? या प्रश्नावर खुद्द शरद पवारांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले आहे.
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, आम्हाला या देशात स्थिर आणि विकासाला प्रोत्साहित करणारे नेतृत्व हवे आहे. उद्या जनतेने उत्तम प्रकारची साथ दिली त्यातून असे नेतृत्व काढू. माझ्यासारख्याची जबाबदारी आहे की अशा नेत्यांना पूर्ण साथ देणे आणि मदत देणे. मी सध्या सर्व विरोधकांशी बोलतोय, मला स्वत:ला उभे राहायचे नाही.
मला या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी हातभार लावायचा आहे. माझा तो प्रयत्न सुरू आहे. नितीश कुमारांचा सुरू आहे. अनेकांचा चालू आहे. मी निवडणुकीला उभे राहणार नाही तसेच पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मी अजिबात नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.