पंतप्रधानांनी केली शाहबानोची आठवण; नक्की काय म्हणाले?

नवी दिल्ली : नव्या संसद भवनात प्रवेश करण्यापूर्वी जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पक्ष आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना ज्येष्ठतेनुसार बोलण्याची संधी मिळाली. यावेळी शाहबानो प्रकरणाचा उल्लेख करून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरही ताशेरे ओढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “मुस्लिम भगिनी आणि मुली ज्या न्यायाची वाट पाहत होत्या तो न्याय याच संसदेने दिला. शाह बानो प्रकरणामुळे ट्रेन थोडी उलटी झाली होती. या सभागृहाने आमच्या चुका सुधारल्या आणि आम्ही मिळून तिहेरी तलाकविरोधात कायदा केला.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “आज संसदेच्या नवीन इमारतीत आपण सर्वजण मिळून नवीन भविष्याचा श्री गणेशा करणार आहोत. विकसित भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार करून, पुन्हा एकदा दृढनिश्चय करून आणि पूर्ण करण्यासाठी मनापासून काम करण्याच्या उद्देशाने आज आम्ही येथील नवीन इमारतीकडे वाटचाल करत आहोत.”
पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, “आपण सर्वजण अशा काळात आहोत, आपण भाग्यवान आहोत. अशा वेळी आपल्याला काही जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाली आहे आणि आपले सर्वात मोठे भाग्य म्हणजे आज आपल्या आकांक्षा अशा उंचीवर आहेत जी कदाचित गेल्या हजार वर्षात नसेल. गुलामगिरीच्या साखळदंडांनी आकांक्षा दाबून टाकल्या होत्या. आज भारताला नवीन ध्येये गाठायची आहेत.”