तरुण भारत लाईव्ह । १५ ऑक्टोबर २०२३। पंतप्रधान नरेंद्र मोदी याना संपूर्ण देशाचा कारभार सांभाळावा लागतो. दररोजच्या बैठका महत्वाचे निर्णय, विविध राज्यांचे दौरे, असा त्यांचा व्यस्त दिनक्रम असतो. या सर्व व्यापातून वेळ काढत पंतप्रधान मोदी यांनी नवरात्रीनिमित्त गरबा लिहिल्याचे त्यांनी सोशल मीडियावर शेयर केले.
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवे गरबा गीत लिहिले आहे. या गीताचे ते नवरात्रीच्या काळात अनावरण करणार आहेत. ध्वनी भानुशाली, तनिष्क बागची आणि जस्ट म्युझिकच्या टीमचे त्यांनी या गरबा गीताच्या संगीतासाठी आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले कि, ‘मी अनेक वर्षांपूर्वी लिहिलेल्या गरब्या गीताच्या सुंदर सादरीकरणासाठी ध्वनी भानुशाली, तनिष्क बागची आणि जस्ट म्युझिकच्या टीमचे आभार! यामुळे अनेक आठवणी जाग्या होतात,’ अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या.
गेल्या काही दिवसांपासून मी एक नवीन गरबा लिहिण्यास सुरुवात केली आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात मी ते प्रकाशित करीन,’ असे मोदी यांनी नमूद केले. ध्वनी भानुशाली यांच्या पोस्टवर मोदी यांनी लिहिलेले हे उत्तर होते. ‘प्रिय नरेंद्र मोदीजी, तनिष्क बागची आणि मला तुम्ही लिहिलेला गरबा खूप आवडला आणि आम्हाला नवीन ताल, रचना आणि बाज असलेले गाणे तयार करायचे होते. ‘जस्ट म्युझिक’ने आम्हाला हे गाणे आणि व्हिडीओ अधिक उत्तम करण्यास मदत केली,’ असे भानुशाली यांनी नमूद केले होते.