पंतप्रधान मोदींच्या भाषणात अमेरिकन खासदार उभे राहून वाजवत होते टाळ्या; वाचा काय घडले

वॉशिंग्टन : अमेरिका दौर्‍यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या संसदेला संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात यावेळी त्यांनी भारत-अमेरिका संबंधांसह दहशतवाद, रशिया युक्रेन युद्ध यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मोदींच्या भाषणावेळी अमेरिकन संसदेत मोदी-मोदीचा गजर ऐकायला मिळाला. विशेष म्हणजे मोदींच्या भाषणावेळी तीन वेळा अमेरिकन खासदारांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडात केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषण करण्यासाठी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १.३० वाजता अमेरिकेच्या संसदेत पोहचले. अमेरिकेच्या संसदेत भाषण करण्याची ही त्यांची दुसरी वेळ होती. ज्यावेळी मोदी संसदेत आले तेव्हा मोदी-मोदीचा गजरही झाला. याआधी २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेत भाषण दिलं होतं.

अमेरिकन संसदेतील समोसा कॉकस

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिका दौर्‍यामध्ये तेथील संसदेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भारत-अमेरिका संबंधांसह भाष्य केलं. ते म्हणाले, की लोकांमध्ये असलेल्या समानतेच्या जोरावर अमेरिका टिकून आहे. जगभरातून आलेल्या लोकांना समान वागणूक देत, अमेरिकेने त्यांना आपल्या सोबत घेतलं आहे. अमेरिकेत भारतातून आलेले लाखो लोक आहेत. यांपैकी कित्येक लोक इथं संसदेत देखील बसले आहेत. विशेष म्हणजे, यांपैकीच एक माझ्या मागेही उभ्या आहेत, ज्यांनी खरंतर इतिहास रचला होता. पंतप्रधान मोदी यावेळी कमला हॅरिस यांच्याबद्दल बोलत होते. कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या अशा उपराष्ट्रपती आहेत, ज्या भारतीय वंशाच्या आहेत. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, की अमेरिकेच्या संसदेत हल्ली समोसा कॉकसचा प्रभाव भरपूर दिसून येतो. मला विश्वास आहे, की आता विविध भारतीय खाद्यपदार्थ देखील इथं पहायला मिळतील. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी देखील समोसा या खाद्यपदार्थाचा उल्लेख करून केलेल्या कौतुकानंतर कमला हॅरिस हसू लागल्या होत्या. तर, संसदेतील इतर खासदारांनी टाळ्या वाजवून मोदींच्या या कौतुकाला दाद दिली.

मोदींनी सांगितला एआयचा नवा अर्थ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात एआय या शब्दाचा नवा अर्थ सांगितला. एआय चा अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा होतो. मात्र त्यांनी आपल्या भाषणात वेगळा अर्थ सांगितला. मोदी म्हणाले की, आजचा काळ हा एआय म्हणजेच आर्टिफिशयल इंटेलिजन्सचा आहे. मात्र आज मी तुम्हाला एआय चा नवा अर्थ सांगतो. एआय म्हणजे अमेरिका-इंडिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वाक्य उच्चारताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

२०२५ पर्यंत भारत जगातली तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल

आधी भारत हा जगातली दहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश होता. मात्र आता भारत जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. २०२५ पर्यंत भारत जगातली तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश होईल याबाबत माझ्या मनात शंका नाही. भारतात विकासाला प्रचंड मोठी गती मिळाली आहे. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

भारताचा विकास हा इतर देशांवर सकारात्मक परिणाम करतो

भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर महात्मा गांधी आणि मार्टिन लूथर किंग यांचा प्रभाव आहे. भारतात २ हजार ५०० राजकीय पक्ष आणि १ हजारांहून अधिक भाषा बोलल्या जातात. दर १०० मैलांवर खाद्यसंस्कृतीही बदलते. जगाच्या लोकशाहीचा सहावा भाग भारत आहे. भारताचा विकास हा इतर देशांवर सकारात्मक परिणाम करणारा ठरतो. कारण भारत जेव्हा प्रगती करतो तेव्हा इतर देशही प्रगती करतात. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ असा नाराही यावेळी मोदींनी भाषणात दिला.

दहशतवादाच्या मुद्द्यावर काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांननी अमेरिकेवर झालेला ९/११ चा हल्ला आणि भारतावर झालेला २६/११ चा दहशतवादी हल्ला याबाबत आपल्या भाषणात भाष्य केलं. ते म्हणाले, दहशतवाद हा माणुसकीचा शत्रू आहे. हा दहशतवाद मोडून काढण्यासाठी योग्य पद्धतीने लढावं लागेल. आपल्या देशांची एकजूट या दहशतवादाचा सामना करु शकते. मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतरही दहशतवादाचा धोका आहेच. त्याचा बिमोड करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता आहे. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशिया आणि युक्रेन युद्धाचाही उल्लेख केला. ते म्हणाले ही वेळ युद्धाची नाही. युक्रेनमध्ये सुरु असलेला रक्तपात थांबणं आवश्यक आहे. भारतातर्फे दोन्ही देशांना शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे.