पंतप्रधान मोदींनी केला मेट्रोमधून प्रवास

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी सकाळी दिल्लीच्या मेट्रोमधून प्रवास करत दिल्लीकरांना सुखद धक्का दिला. यावेळी मेट्रोमध्ये असलेल्या प्रवाशांशी त्यांनी गप्पाही मारल्या. ते दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर हँडलवरून या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. डीयूमधील कार्यक्रमाला जाताना दिल्ली मेट्रोमध्ये तरुण-तरुणींसोबत प्रवास करून आनंद झाला अशा आशयाचं कॅप्शन देत पंतप्रधानांनी पोस्ट केली आहे.

नेहमीप्रमाणे मेट्रोमधून प्रवासासाठी निघालेल्या दिल्लीकरांना यामुळे आश्चर्याचा मोठा धक्का बसला. थेट पंतप्रधानांशी भेट झाल्यामुळे हे प्रवासी अतिशय आनंदात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी समारंभाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते विद्यापीठातील विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करतील. तसेच, विद्यापीठाच्या तीन नव्या इमारतींची पायाभरणी देखील ते करतील.

दरम्यान, या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे. कोणत्याही कारणास्तव आज गैरहजर राहता येणार नाही, अशी सूचना दिली आहे. तसेच, कार्यक्रमाला येताना विद्यार्थ्यांना काळ्या रंगाचे कपडे घालण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पांढर्‍या किंवा अन्य रंगाचे कपडे घालूनच कार्यक्रमाला यावं, असं सांगण्यात आलं आहे.