कर्नाटकमधून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. पतीला घटस्फोट देत प्रियकरासोबत राहणारी सौमिनी दास आणि तिचा प्रियकर अबिल अब्राहम या दोघांनी आत्महत्या केली आहे. पतीच्या एका फोननंतर तिने आणि तिच्या प्रियकराने आपल्याच फ्लॅटमध्ये आग लावत आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलकात्याच्या सौमिनी दासचे २०२१ मध्ये लग्न झाले होते. सध्या ती बंगळुरूजवळील मराठहल्ली येथील एका खासगी महाविद्यालयात बीएससी नर्सिंग करत होती. कॉलेजपासून १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोथानुरमध्ये अबिल अब्राहमने आपली नर्सिंग एजन्सी उघडली होती.
अब्राहमच्या नर्सिंग एजन्सीमध्ये सौमिनी दास काम करायची. ३ महिन्यांपूर्वी त्या दोघांची भेट झाली आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर सौमिनीने घरगुती हिंसाचाराचा आरोप करत तिच्या पतीला घटस्फोट दिला. तसेच ती आयुष्यभर प्रियकर अब्राहमसोबत राहणार असल्याचे तिने आपल्या पतीला सांगितले.
त्यानंतर सौमिनी आणि अबिल अब्राहम कर्नाटकातील कोथानुर येथे एका फ्लॅटमध्ये राहत होते. दरम्यान, ५ नोव्हेंबर रोजी सौमिनीच्या पतीने अचानक तिला फोन केला आणि त्यांच्यात काहीतरी बोलणे झाले. या फोननंतर सौमिनी आणि तिचा प्रियकर अबिल अब्राहम या दोघांनी पेट्रोल ओतून घराला आग लावली आणि आत्महत्या केली. आजूबाजूचे लोक मदतीला धावून येण्याच्या आतच दोघांचाही मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.