अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन हत्या केली. या धक्कादायक खून प्रकरणाचा पर्दाफाश करून पोलिसांनी तीन आरोपींसह महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
संभाजीनगर येथे गणेश दराखे हे आपल्या पत्नीसह वास्तव्यास होते. मिस्तरीचे काम करून आपलं उदरनिर्वाह करीत होते. त्यांनी नुकतेच २१ लाख रुपयात घर विकले होते.
गणेश यांच्या पत्नीचे सुपडू सोनू गायकवाड (३५, रा.कु-हाड ता.पाचोरा ) याच्याशी अनैतिक संबंध होते. त्याच्यासोबत संसारवेल फुलविण्यासाठी पती अडसर ठरत होते.
दरम्यान, प्रियकर सुपडूच्या मदतीने अमोल चिंतामण चौधरी (३३), अजय दिलीप हिवाळे (२५), अनिकेत कडूबा चौथे (२४) सर्व राहणार पहूर कसबे ता.जामनेर जि.जळगाव यांना २ लाख रूपयांची सुपारी देण्यात आली.
प्रियकर सुपडू गायकवाड याने पहूरच्या अमोल चौधरी याला २ लाख रुपये पोहचवले. अमोल अनिकेत व अजय यांनी पैशांची वाटणी केली. शनिवार, ४ रोजी सकाळी घरातुन कामावर जाण्यासाठी निघालेल्या गणेश दराखे यांना तिघांनी रस्त्यातच गाठून गळा चिरून हत्या केली.
दरम्यान, गणेश दराखे यांच्या पत्नीवर पोलीसांना संशय आल्याने तिला बोलते केले. प्रियकर सुपडू गायकवाड व पहूर येथील अमोल चौधरी ,अनिकेत चौथे ,वअजय हिवाळे यांच्यावर संभाजीनगर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील आरोपी शोधकामी संभाजीनगरचे पोलीस तपास पथकातील पीएसआय प्रवीण वाघ ,हे.काॕ.संजय नंद,विजय निकम,विजय भाणुसे,मनोहर गिते,चालक संतोष चौरे हे पहूर येथे आले होते. पहूर पोलीस स्टेशनचे एपीआय सचीन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पहूर पोलीसांसह गुन्हे शोध पथकातील अंमलदार गोपाल माळी यांनी तांत्रिक मदतीच्या सहाय्याने आरोपीअमोल चिंतामण चौधरी, अजय दिलीप हिवाळे, अनिकेत कडूबा चौथे सर्व रा. पहूर कसबे व सुपडू सोनू गायकवाड रा.कु-हाड ता.पाचोरा यांना ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या व संभाजीनगर पोलीसांच्या स्वाधीन केले.