आगर माळवा : आगर माळवा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती-पत्नीच्या वादातून पत्नीने आधी पतीचे नाक कापले. यामुळे संतापलेल्या पतीने तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बबिता पाटीदार आणि त्रिलोक पाटीदार अशी पती-पत्नीची नावे आहेत.
सूत्रानुसार, जिल्ह्यातील नालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुशलपुरा गावात ही घटना घडली आहे. गावातील रहिवासी त्रिलोक पाटीदार आणि त्यांची पत्नी बबिता पाटीदार हे शेतात मजुरीसाठी गेले होते. शेतातच काही कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. क्षुल्लक कारणातून झालेल्या वाद पत्नीच्या जीवावर बेतला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. आरोपी पतीलाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून आरोपी पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.