नंदुरबार : चारीत्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून करणाऱ्या नराधम आरोपी पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली असून, पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. अरुण सुकलाल नामदास (36) असे आरोपीचे नाव आहे.
नंदुरबार शहरात वास्तव्यास असलेला आरोपी अरुण सुकलाल नामदास (36) हा मयत पत्नी रेखा अरुण नामदास हिच्या चारीत्र्यावर संशय घेत होता. दरम्यान, दि. 22 जून 2022 रोजी घरात दोघांत कडक्याचे भांडण झाले होते. याच रागातून आरोपी अरुण याने पत्नी रेखा हिचा चाकुने गळा चिरुन हत्या केली होती. या प्रकरणी अशोक देवराम खांडेकर यांचे फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाणे गु.र.नं. 147/2022 भा.द.वि. कलम 302 प्रमाणे दि. 22 जून 2022 रोजी आरोपीताविरुध्द् गुन्हा दाखल झाला होता.
उपनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहा.पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे व त्यांचे सहकारी पोलीस शिपाई विपुल पाटील यांनी सदर गुन्ह्याचा तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते. आरोपी विरुध्द् दोषारोपपत्र अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार एम. आर. नातू यांनी साक्षीदारांचे जबाब, पंच, आणि परिस्थितीजन्य पूरावे तपास अधिकारी यांची साक्ष, सरकारी पक्षाचा युक्तीवाद यासर्व बाबींचा विचार करुन आरोपी अरुण सुकलाल नामदास वय 36 रा. प्लॉट नं. 30, सरोज नगर, नंदुरबार ता. जि. नंदुरबार यास भारतीय दंड संहितेच्या कलम 302 मध्ये जन्मठेपेची शिक्षा व 5000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सदर खटल्याचे कामकाज नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय वसावे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी केले असून मा. न्यायालयात खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ऍ़ड. विजय चव्हाण यांनी पाहिले होते. पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस उप निरीक्षक राहुल भदाणे, पोलीस हवालदार नितीन साबळे व पोलीस नाईक गिरीष पाटील, यांनी कामकाज केले आहे.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी अभिनंदन केले आहे.