जळगाव । सध्या तरुण-तरुणींमध्ये आत्महत्या सारखे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. अशातच आता जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील तरुणाने मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. रमेश उर्फ रवींद्र निंबा पाटील (वय ३२, रा. अशोक नगर, शिरसोली प्र.न. ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रमेश उर्फ रवींद्र निंबा पाटील हा शिरसोली येथील अशोक नगर मध्ये पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, मोठा भाऊ यांच्यासह वास्तव्याला होता. गावात फोटोग्राफीचा व्यवसाय करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.दरम्यान, रविवारी मध्यरात्री घरातील स्वयंपाक घरात दरवाजा बंद करून झोक्याच्या दोरीला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी शितल झोपेतून उठली तेव्हा पती दिसून आले नाही. त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्वयंपाक घराचा दरवाजा आतमधून बंद होता. त्यांनी शेजारच्या नागरिकांना बोलावून दरवाजा तोडला. तेव्हा तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
नातेवाईकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, दोन दिवसांपासून तो काहीतरी कौटुंबिक विवंचनेत असल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जितेंद्र राठोड हे करीत आहेत.