पत्रकारांवर अघोषित आणीबाणी लावणारी मविआ कधी माफी मागणार?

मुंबई : आक्षेपार्ह व्हीडिओ प्रसारित केल्यामुळे केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने एका मराठी वृत्त वाहिनीच्या प्रसारणावर ७२ तासांची बंदी घातली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती. त्याला आता महाराष्ट्र भाजपने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्र भाजपने आपल्या ट्विटमध्ये इंडी आघाडीने १४ पत्रकारांवर घातलेल्या बंदीची आठवण करुन दिली. ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सुप्रिया ताई लोकशाहीचा चौथ्या स्तंभ राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवतो हे तुम्ही मान्य केलं याबद्दल आपले आभार. कारण तुम्ही ज्या इंडी आघाडीत आहात त्यांनी १४ पत्रकारांवर बहिष्कार टाकला आणि पुन्हा आणीबाणी लादली. एवढंच नाही तर यापूर्वी सत्तेत असताना तुम्ही पत्रकारांना कशा पद्धतीने घरातून उचलून अटक केली. करोना काळात त्यांच्यावर कसे गुन्हे दाखल केले हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे.”
महाविकास आघाडी सरकारच्या काळात पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. त्यावरही महाराष्ट्र भाजपने सुप्रिया सुळेंवर निशाना साधला. ट्विटमध्ये म्हटले आहे की, “तुमचं मविआ सरकार असताना विरोधात बोललं म्हणून संपादक अर्णब गोस्वामी यांना तुरुंगात डांबलं, बातमी दिली म्हणून पत्रकार राहुल कुलकर्णी यांना अटक केली, अनेक पत्रकारांवर गुन्हे दाखल केले. लोकशाही व्यवस्था पायदळी तुडवली त्या बेजबाबदारपणाबद्दल कधी माफी मागणार?”