पत्रकाराला अपमानास्पद वागणूक; अमळनेरमध्ये निषेध

अमळनेर :  बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचे वार्ताकन करणाऱ्या महिला पत्रकाराला माजी नगराध्यक्षाने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा व्हॉइस ऑफ मीडियातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. याबाबत तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन देण्यात आले.

बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत अल्पवयीन दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने संपूर्ण देश अस्वस्थ होऊन सर्वत्र पडसाद उमटले आहेत. या लैंगिक अत्याचार प्रकरणाचे वार्ताकन करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकार यांना माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अपमानास्पद वागणूक दिली. या घटनेचा “व्हाईस ऑफ मीडिया” या पत्रकार संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

व्हाईस ऑफ मीडियाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली आज निवेदन देण्यात आले. यावेळी साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष उमेश काटे, सचिव जितेंद्र पाटील, कोषाध्यक्ष रवींद्र मोरे, सहसचिव ईश्वर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष जयंत वानखेडे, उमेश धनराळे, बापूराव पाटील, कमलेश वानखेडे, दयाराम पाटील व जयेशकुमार काटे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.