नंदुरबार : पत्र्याच्या गोडाऊनला आग लागून पाच ते सहा गोडावून मधील टीव्ही, फ्रीज, कूलर, पत्रावळी ग्लास व इतर साहित्य, सोडा बॉटल, खाद्यपदार्थ जळून राख झाली. शहादा शहरातील मेमन कॉलनीत सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दिवाळीनिमित्त विक्रीसाठी आणलेला इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू या आगीत खाक झाल्या. आग कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही. पोलिसात रात्री उशिरापर्यंत आगीची नोंद करण्याचे काम सुरू होते.
शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर मेमन वसाहतीत पत्र्याचे आठ-दहा गाळ्यांचे शेड व गोडावून आहे. या गोडाऊनला सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आग लागून रुपेश भट यांच्या मालकीचे शक्ती प्लाझामधील दिवाळीनिमित्त विक्रीसाठी आणलेल्या इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू फ्रिज, टीव्ही, कूलर चक्की, स्पीकर यासह बिले, चेकबुक, खरेदीचे बील आदी कागदपत्रे जळून खाक झाली.
धर्मेंद्र नहाटा यांच्या दुकानातील इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून नुकसान झाले. याच ठिकाणी रियाज शेखाणी यांचा पत्रावळी, पेपर कप व प्लास्टिकचे इतर साहित्य बनविण्याचा कारखाना आहे. त्यांचे मशीनरीसह साहित्य जळाले आहे. दादाभाई इसाणी यांचे इलेक्ट्रिक साहित्याचे दुकान व राजू सोडावाला, अझर इसाणी यांचे गॅस भरण्यासाठी असलेले मशीन आगीत भस्म झाले आहे. पाच-सहा गोडाऊनमधील सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचे साहित्य व मशीनरी जळाली आहे या ठिकाणी असलेल्या एका गोडावूनमध्ये रुग्णालयात लागणारे भरलेले व खाली सिलिंडर ठेवलेले होते. सिलिंडर ठेवलेल्या गोडावूनला अग्निशामक बंद लावून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. काही गोडावूनमध्ये इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक साहित्य ठेवलेले होते.
काही व्यापाऱ्यांनी दिवाळीनिमित्त लाखो रुपयांच्या वस्तू आणल्या होत्या. मात्र आगीत हे सर्व साहित्य खाक झाल्याने व्यापारी हतबल झाले आहेत. आगीत मोठे नुकसान झाल्याने व्यापारी व त्यांच्या परिवाराला अश्रू आवरता आले नाही. आग लागल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत व पोलिस कर्मचान्यांनी घटनास्थळी तातडीने दाखल होत सहकार्य केले. याचसोबत पालिकेचे माजी गटनेते प्रा. मकरंद पाटील, पालिका मुख्याधिकारी दिनेश शिनारे, संतोष वाल्हे भाजपचे माजी शहराध्यक्ष विनोद जैन, इरफान पठाण, शफू तेली, माजी सरपंच राजू माळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी धाव घेत आग विझविण्यासाठी मदत केली.