जळगाव : जेईई परीक्षेत कमी गुण मिळाल्याने निराश झालेल्या विद्यार्थ्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही दुर्देवी घटना बुधवार, १४ फेब्रुवारी रोजी सकाळी मेहरुण परिसरातील जोशीवाडा परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
शहरातील मेहरुण परिसरातील जोशीवाडा परिसरात यश खर्चे हा आई वडीलांसह वास्तव्यास होता. त्याच परिसरातील असलेल्या राज विद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होता. मंगळवार, १३ फेब्रुवारी रोजी जेईई परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत यशला कमी गुण मिळाल्यामुळे तो काहीसा निराश झाला होता. मंगळवारी रात्री यशने आपल्या कुटुंबीयांसोबत जेवण केल्यांनतर आपल्या खोलीत गेला. मध्यरात्रीच्या सुमारास यशने खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. त्याचे कुटुंबीय सकाळच्या सुमारास त्याला उठविण्यासाठी गेले. बराच वेळ आवाज दिला तरी आतून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी घराचा दरवाजा तोडला. यावेळी यश हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्याच्या कुटुंबाला जबर धक्का बसला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा करुन यशचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनीशविच्छेदन केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.