नंदुरबार : अल्पवयीन मुलगीला पोटदुखीच्या उपचारासाठी आईने रुग्णालयात नेले असता अतिशय धक्कादायक व घृणास्पद प्रकार उघडकीस आला. सदर मुलगी गर्भवती असल्याचे आढळून आले. यावर कळस म्हणजे तिच्या बापानेच हे पाप केल्याचे तपासात उघड झाले. यामुळे आईसह, डॉक्टर, पोलिसही चक्रावले. बाप-लेकीच्या पवित्र नात्याला कलंक लावणाऱ्या या नराधम पित्याविरोधात शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रानुसार, शहादा तालुक्यातील पीडित १३ वर्षीय मुलगी पोट दुखत असल्याने आपल्या आईसह दवाखान्यात गेली होती. डॉक्टरांनी मुलीला तपासले असता, ती गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली. याविषयी डॉक्टरांनी पीडितेला विचारले असता पीडितेने वडिलांनीच अत्याचार केल्याचे सांगितले.
यामुळे आईसह, डॉक्टर, पोलिसही चक्रावले. आईच्या फिर्यादीवरून बाप-लेकीच्या पवित्र नात्याला कलंक लावणाऱ्या नराधम पित्याविरोधात शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी शहाद्याचे पोलिस उपविभागीय अधिकारी दत्तात्रय पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजन मोरे, प्रतापसिंग मोहिते, पोलिस उपनिरीक्षक माधुरी आर. कंखरे आदींनी लागलीच घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मधुरी कंखरे करीत आहेत.