धुळे : शेतातील झोपडी फोडून चोरट्याने शेती पिकांसह विविध साहित्य असे एकूण ७० हजारांचा ऐवज शिताफीने लांबविला. ही घटना साक्री तालुक्यातील चिंचखेडा गावाच्या शिवारात बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दुपारी अडीच वाजता घरफोडीचा गुन्हा दाखल झाला.
महेंद्र कैलास काकुस्ते (वय ३०, रा. चिंचखेडा ता. साक्री) या तरुणाने साक्री पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली. त्यानुसार, साक्री तालुक्यातील चिंचखेडा शिवारात महेंद्र काकुस्ते यांचे शेत आहे. या शेतातच झोपडी वजा घर तयार करण्यात आले आहे. शेतातील घरात शेती पिकांसह विविध साहित्य ठेवण्यात आले होते.
कोणीही नसल्याची संधी चोरट्याने साधली. १० गव्हाचे पोते, २ क्विंटल कापूस, ४ क्विंटल मका तसेच रोटर पिस्टन, इलेक्ट्रिक पाण्याची मोटार असा ७० हजारांचा ऐवज चोरट्याने लंपास केली. चोरीची ही घटना मंगळवारी रात्री ८ ते बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली.
सकाळी नेहमीप्रमाणे शेतात आल्यानंतर झोपडीत चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. सर्वत्र शोध घेऊनही कोणीही सापडले नाही. याप्रकरणी बुधवारी दुपारी अडीच वाजता साक्री पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हेड कॉन्स्टेबल व्ही. ए. देसले घटनेचा तपास करीत आहेत.