पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांचा मोठा खुलासा; वाचा काय म्हणाले…

मुंबई : शरद पवारांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राचा दुसरा भाग नुकताच प्रकाशित झाला. या दुसर्‍या भागात २०१५ पासून ते २०२३ पर्यंतच्या अनुभवी आणि प्रसंगारुप घटनांची माहिती शरद पवार यांनी लिहिली आहे. त्यातच, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन केलेल्या शपथविधीवरही पवार यांनी खुलासा केलाय. ‘अजित पवारांनी उचललेलं पाऊल अत्यंत गैर होत. माझ्या नावाचा वापर करून आमदारांना राजभवनात नेलं, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी या पुस्तकात केला आहे.

काय म्हटलं आहे पुस्तकात…

‘महाविकास आघाडीचा यशस्वी होऊ घातलेला पट उधळून लावण्यासाठी केंद्र सरकार, राजभवन आणि राज्यातल्या भाजपानं केलेला हा रडीचा डाव होता. यातून राजकीय कंड्या पिकण्याआधी, हा गोंधळ निस्तरणं आवश्यक होतं. मी पहिला फोन उद्धव ठाकरेंना केला आणि राजभवनात पहाटे घडलेल्या नाट्याची त्यांना कल्पना दिली. त्यांना ही माहिती सर्वप्रथम माझ्याकडूनच मिळत होती. ‘अजितनं उचललेलं पाऊल अत्यंत गैर असून, याला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजिबात पाठिंबा नाही,’ असं मी त्यांना निःसंदिग्ध शब्दांत सांगितलं. राष्ट्रवादीच्या काही आमदारांना माझ्या नावाचा गैर वापर केला, असे पवार यांनी पहाटेच्या शपथविधी संदर्भात लोक माझे सांगाती या पुस्तकात लिहिले आहे.

याबाबत शरद पवार पुढे लिहितात की, त्यानंतर आम्ही पहिला निर्णय घेतला, तो बंड मोडुन काढण्याचा. आमच्या पदाधिकार्‍यांशी आणि सहकार्‍यांशी बोलून गेलेल्या सर्व आमदारांना परत आणण्यासाठी पावलं उचलायला मी सांगितली. ‘चव्हाण प्रतिष्ठान’ला राष्ट्रवादीचे चोपन्नपैकी पन्नास आमदार उपस्थित असल्यानं तशीही बंडातली हवा निघालीच होती. तरीही महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत नेमकी माहिती पोहचणं आवश्यक होतं. त्याचाच भाग म्हणून आम्ही पत्रकारपरिषद घेतली. दुपारी झालेल्या या पत्रकारपरिषदेला उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेतेही उपस्थित राहिल्यानं ’महाविकास आघाडी’ अभेद्य असल्याचा पक्का संदेश गेला, असंही शरद पवार यांनी पुस्तकातून सांगितलंय.