पुणे : राज्यात बहुतांश ठिकाणी वळवाने हजेरी लावली असली, तरी अनेक ठिकाणी पाऊस झालेला नाही. मृग नक्षत्र ८ जूनला सुरू झाले असून शेतकरी मिरगाचा पाऊस कधी बरसणार, याकडे डोळे लावून बसला आहे. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून बरसणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, अजून पावसाची चिन्हे दिसेनाशी झाली आहेत. यामुळे पाऊस कधी बरसणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यापार्श्वभूमीवर हवामान खात्याने नवा अंदाज वर्तविला आहे.
मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात पाऊस कधी दाखल होणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. वादळी वार्यांमुळे मान्सून केरळमध्ये यंदा उशिराने दाखल झाला आहे, त्यामुळे महाराष्ट्रालाही पावसासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. सर्वजण उन्हाच्या तडाख्यापासून सुटका मिळण्याची वाट पाहत आहेत. एकीकडे केरळमध्ये पाऊस पोहोचला आहे. पण, मुंबईसह राज्यातील काही भागांत अजूनही उन्हाचा फटका बसत आहे. त्यामुळे सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्रात पावसाच्या अंदाजाबाबत हवामान विभागाने माहिती दिली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता मान्सून तामिळनाडू आणि कर्नाटकच्या दिशेने पुढे सरकत आहे. मान्सून बंगालचा उपसागर आणि दक्षिण पश्चिम मध्य आणि ईशान्य भागात पोहोचणार आहे. हवामान विभाग यावर लक्ष ठेवून आहे. पुढील २४ तासांत तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. एकीकडे अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झालं असताना दुसरीकडे देशात मान्सून पोहोचला आहे. आयएमडी प्रादेशिक हवामान केंद्राचे मुंबई प्रमुख एस.जी. कांबळे यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात १० जून आणि मुंबईत ११ जून ही मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख आहे. मान्सून सध्या केरळमध्ये पोहोचला असून त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवलं जात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनच्या सुरुवातीबाबत माहिती मिळेल.
१८ जूनपर्यंत महाराष्ट्रात पाऊस
साधारणपणे १ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होणार्या पाऊस ८ जूनला केरळमध्ये पोहोचला. या पार्श्वभूमीवर १८ जूनपर्यंत महाराष्ट्रात पाऊस येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यामध्ये दोन ते तीन दिवसांचा फरक जाणवू शकतो. हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांच्या मते, बिपरजॉय चक्रीवादळ पुढील ४८ तासांत तीव्र चक्री वादळात रूपांतरित होईल. तसेच पुढील तीन दिवसांत ते उत्तर भारताकडे सरकणार आहे. स्कायमेट वेदरनुसार, पुढील तीन ते चार दिवस खूप तीव्र चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळाचे थरारक व्हिडिओ
अरबी समुद्रातील बिपारजोय हे चक्रीवादळ हे वेगाने भारताच्या किनारपट्टीच्या दिशेने येत असून गुरूवारी गुजरातेतील कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदराला येऊन धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे सरकारने त्या भागात रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांचे स्थलांतर केले आहे. तर या चक्रीवादळाचे थरारक व्हिडिओ आता समोर आले आहेत. या चक्रीवादळामुळे येणार्या आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला असून पथके तैनात करण्यात आली आहेत. भारतीय तटरक्षक दलाची जहाजे गुजरातच्या किनारपट्टीवर गस्त घालत आहेत.