पाकव्याप्त काश्मीर भारताचेच, पाकिस्तानचे मित्र युएईनेही मान्य केलं

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरबाबत (पीओके) पाकिस्तानने केलेला अपप्रचार फोल ठरला आहे. एकेकाळी पाकिस्तान प्रत्येक प्रपोगंडास पाठिंबा देणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीनेही (युएई) आता पीओके हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य केले आहे.
युएईचे उपपंतप्रधान सैफ बिन झायेद अल नाहयान यांनी भारत – पश्चिम आशिया – युरोप आर्थिक कॉरिडॉरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जम्मू-काश्मीरचा संपूर्ण केंद्रशासित प्रदेश भारताचा भाग म्हणून दाखवण्यात आला आहे. त्यात पीओके आणि अक्साई चिनचा भाग देखील समाविष्ट आहे. त्यामुळे आता प्रमुख इस्लामिक देशही आता काश्मीर प्रश्नावर पूर्णपणे भारतासोबत उभे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
युएईने यापूर्वीच जम्मू – काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्यास प्रारंभ केला आहे. दुबईमधील रिअल इस्टेट डेव्हलपर एमार ही श्रीनगरमधील 1 दशलक्ष चौरस फुटांच्या मेगा-मॉलमध्ये गुंतवणूक करणारी पहिली विदेशी कंपनी ठरली आहे. कलम ३७० संपुष्टात आणल्यानंतर युएईने ही गुंतवणूक केली आहे. एमार समुहाने मेगा-मॉल उभारण्यासाठी 250 कोटी रूपये गुंतवण्याची योजना आखली आहे. हा मॉल 500 हून अधिक स्टोअर्स असलेला प्रदेशातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक असेल. जम्मू-काश्मीरमधील ही पहिली थेट विदेशी गुंतवणूक ठरली आहे.

पाकिस्तान अनेक दशकांपासून काश्मीरबाबत मुस्लिम देशांमध्ये अपप्रचार करण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतेच भारतात झालेल्या जी२० परिषदेदरम्यान त्यांनी सदस्य देशांना पत्र लिहून भारतावर खोटे आरोप केले होते. भारत काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. जम्मू-काश्मीरमधील जी-20 बैठकीवरही पाकिस्तानने आक्षेप घेतला होता आणि हा वादग्रस्त भाग असल्याचे म्हटले होते.
पंतप्रधानांची प्रभावी मुत्सद्देगिरी
युएईच्या भूमिकेमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्देगिरीचा सर्वांत मोठा वाटा आहे. पंतप्रधान मोदी यांनी अतिशय काळजीपूर्वक अरब देशांसह जगातील अन्य मुस्लिम राष्ट्रांसोबत भारताचे धोरण आखले आहे. पाकिस्तानचा प्रपोगंडा हा जगासाठीदेखील कसा धोकादायक आहे आणि त्याचे परिणाम अरब राष्ट्रांनाही भोगावे लागणार आहेत, असे भारताने कौशल्याने पटवून दिले आहे. त्यामुळे आता अरब राष्ट्रे भारतासोबत आपले संबंध मजबूत करण्यासाठी उत्सुक आहेत.