नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान दिवंगत जुल्फिकार भुट्टो यांची नात फातिमा भुट्टो सध्या चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे फातिमा भुट्टोने लग्नानंतर आपल्या पतीसह हिंदू मंदिराला भेट दिली. यावेळी तिने शिवलिंगावर दुग्धाभिषेकही केला. या धार्मिक विधीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यातंनर पाकिस्तानमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
४० वर्षीय फातिमाचे शुक्रवारी कराचीमध्ये अत्यंत साध्या पद्दतीने तिचं लग्न पार पडलं. फातिमा आणि तिचा पती ग्राहम जिब्रान रविवारी कराचीमधील ऐतिहासिक मंदिरात पोहोचले होते. हिंदू सिंधींच्या सन्मानार्थ त्यांनी मंदिराला भेट दिल्याची माहिती आहे. दरम्यान माहितीनुसार, फातिमाचा पती ग्राहम जिब्रान ख्रिश्चन असून अमेरिकेचा नागरिक आहे. काही हिंदू नेत्यांनीही या लग्नाला हजेरी लावली.
फातिमा आणि तिच्या पतीचा मंदिरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून कमेंट केल्या जात आहेत. काहींनी त्यांचं कौतुक केलं असून फार उत्तम कामगिरी असल्याचं म्हटलं आहे. मात्र काही युजर्सनी ते मंदिरात नेमकं कशासाठी गेले होते अशी विचारणा केली आहे. ’या परंपरेचा अर्थ काय,’ अशी विचारणा एका युजरने केली आहे. तर एकाने म्हटलं आहे की, सिंधी धर्मनिरपेक्षतेचा अर्थ हिंदूवादाचं अनुसरण करणं असतो का?