पाक पत्रकाराने काढली पाकिस्तानी लष्कराची इज्जत; दिलं कारगिलचं उदाहरण

नवी दिल्ली : दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या लष्करानं पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी दिली आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल अहमद शरीफ यांनी मंगळवारी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत भारताविरोधात वक्तव्य केलं. परंतु यानंतर पाकिस्तानच्या प्रसिद्ध पत्रकार नायला इनायत यांनी स्वत: पाकिस्तानी लष्कराच्या या वक्तव्याला कारगिलचं उदाहरण देऊन आरसा दाखविला.

अखेरच्या वेळी जेव्हा पाकिस्ताननं भारतीय सीमेत युद्ध केलं तेव्हा आपल्या मृत सैनिकांना त्याच ठिकाणी ठेवून पळ ठोकला. इतकंच नाही तर पाकिस्ताननं आपल्या पंतप्रधानांनी सन्मानानं परतावं यासाठी अमेरिकेला रवाना केलं होतं. असं ट्वीट नायला इनायत यांनी शरीफ यांच्या वक्तव्याला उत्तर देताना केलं.

कारगिलमध्ये भारतीय सैन्याने पाकला सळो की पळो करुन सोडले होते. समोर पराभव दिसत असल्याने पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान अमेरिकेला पोहोचले. पाकिस्तानी सैन्याला कारगिलमधून माघार घेण्यासाठी कशीतरी मदत करावी, अशी विनंती नवाझ शरीफ यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना केली होती. पाकिस्तानला भारतीय सैन्याने छोबीपछाड देत मागे फेकले.

माजी लष्करप्रमुख बाजवा यांच्या वक्तव्यावरून गदारोळ सुरू असतानाच पाकिस्तानी लष्कराकडून हे वक्तव्य करण्यात आलंय. पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार हमीद मीर यांनी खुलासा केला की, माजी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी २५ हून अधिक पत्रकारांसमोर कबुली दिली होती की, देशाच्या लष्कराचे टँक काम करत नाहीत आणि त्यांच्याकडे डिझेलसाठीही पैसे नाहीत.