पाचोरा : शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील दहीहंडी खेळताना जखमी झालेला गोविंदा नितीन चौधरीचा अखेर मृत्यु झाला. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
शहरातील रिक्षा स्टॉपसह स्टेशन रोड परीसरातील युवकांनी दहीहंडीचे आयोजन केले होते. यावेळी गोविंदा पथकातील नितीन पांडुरंग चौधरी हा युवक दहीहंडी फोडताना खाली कोसळला. त्याला उपचार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. औषध उपचार सुरू असताना आज २८ रोजी त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. नितीनच्या जाण्याने शहरात शोककळा पसरली आहे. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांनी शवविच्छेदन केले. पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनेचे वृत्त कळताच काँग्रेसचे तालुका अध्यक्ष यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. यावेळी मयत गोविंदा नितीन चौधरी यांच्या परीवाराला शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
नितीन हा रिक्षा चालक होता. घरातील कर्ता पुरुष होता. हसतमुख असणारा आणि नेहमी सामाजिक कार्यात सहभागी होणारा म्हणून त्याची ओळख होती. त्याच्या पच्छात आई, वडील, दोन भाऊ आहेत.