पाचोरा : शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या वतीने नुकताच ‘न्यू होम मिनीस्टर’ कार्यक्रम घेण्यात आला. यात हजारो महिलांनी स्वयंस्फुर्तीने हजेरी लाऊन कार्यक्रमाचे आनंद लुटला. याप्रसंगी विविध गाण्यांसह स्पर्धांमधून पाचोरा-भडगाव मतदारसंघातील परिवर्तनाचा नारा बुलंद करण्यात आला. तर कार्यक्रमाचे सूत्रधार क्रांतीनाना व त्यांची कन्या सह्याद्री यांनी सादर केलेल्या ”शिवसेनेची मशाल निशाणी ठेवा लक्षात, वैशालीताईंना पाठवा तुम्ही विधानभवनात !” या गाण्याला जोरदार दाद मिळाली.
पाचोरा येथील माताश्री कैला देवी मंदिरा शेजारी १ फेब्रुवारी न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी सिने बाल कलाकार सह्याद्री मळेगावकर हिने कार्यक्रमाची सुरूवात केली. याप्रसंगी वैशालीताई सूर्यवंशी यांचे जोरदार जयघोष आणि उर्जावान संगीताचा ताल सुरू असतांना हजारो भगिनींच्या उपस्थितीत वैशालीताई सुर्यवंशी यांचे झोकात आगमन झाले.
यानंतर सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर, वैशाली सुर्यवंशी, महानंदाताई पाटील, कमलताई पाटील, तिलोत्तमा मौर्य आदी मान्यवरांच्या हस्ते महापुरूषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पाचोरा येथील ख्यातनाम उद्योजक व व्यावसायिक मुंकुंद बिल्दीकर यांचे नुकतेच निधन झाले असल्याने कार्यक्रम सुरू होण्याआधी त्यांना उपस्थितांनी दोन मिनिटे मौन बाळगून आदरांजली अर्पण केली. यानंतर वैशाली सुर्यवंशी यांच्याहस्ते क्रांतीनाना मळेगावकर आणि सह्याद्री मळेगावकर यांचा अतिशय हृद्य असा सत्कार करण्यात आला. श्रीगणेश व साई वंदनेने कार्यक्रमाला प्रारंभ झाला आणि उत्तरोत्तर यांची रंगत वाढतच गेली.
लय भारी, लय भारी ह्यो होम मिनीस्टर लय भारी या थीम सॉंगने कार्यक्रमाची अतिशय जबरदस्त जल्लोषात सुरूवात झाली. क्रांतीनाना मळेगावकर हे थेट प्रेक्षकांमध्ये शिरल्यावर त्यांना अतिशय उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभला. पहिल्यांदा त्यांनी लग्नाला एक ते पाच वर्षे पूर्ण झालेल्या महिलांना स्टेजवर बोलावले. यानंतर क्रमाक्रमाने वर्षे वाढवून महिलांना आमंत्रीत केले. यातून व्यासपीठावर शेकडो महिला दाखल झाल्या असता त्यांना उखाणा घेण्यास सांगितले असता अतिशय भन्नाट विनोदी किस्से घडले. यानंतर उपस्थित महिलावर्गांनी व्यासपीठावर तळ्यात-मळ्यात या स्पर्धेत सहभाग घेतला. यात अनेक स्पर्धकांची तारांबळ उडाली असता उपस्थितांनी त्यांना जोरदार दाद दिली. यातून एकेक स्पर्धक बाद होत मोजके स्पर्धक उरले. यानंतर संगीतावरून गाणे ओळखून यावरून नृत्य करण्याचा परफॉर्मन्स झाला. यात ६७ वर्षाच्या स्पर्धक महिलेस सोन्याची नथ हे पारितोषीक म्हणून प्रदान करण्यात आले.
यानंतर व्यासपीठावर पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात वैशालीताईंना पाचारण करण्यात आले. याप्रसंगी क्रांतीनाना मळेगावकर यांनी वैशालीताई यांच्यावर रचलेले शिवसेनेची मशाल निशाणी ठेवा तुम्ही लक्षात | वैशालीताईंना पाठवा तुम्ही विधानभवनात ॥ हे जोशीले गाणे सादर केल्यावर याला जोरदार दाद मिळाली. यानंतर फुगे फुगवून आधी टोचून तर नंतर हाताने फोडण्याची अतिशय धम्माल स्पर्धा सुरू झाली. यातील विनोदी किस्से घडतांना पाहून उपस्थितांनी जोरदार हशा आणि टाळ्यांच्या गजरात दाद दिली. यातील विजेत्यांना पैठणी तर एका महिलेस सोन्याची नथ पारितोषीकाच्या स्वरूपात देण्यात आली. तर, शेवटच्या टप्प्यात विविध गाण्यांवर बहारदार नृत्य करण्यात आले. याप्रसंगी स्वत: वैशालीताई सुर्यवंशी यांनी देखील ठेका धरल्याने उपस्थितांच्या उत्साहाला उधाण आले.
स्नेहा पवार, बेबीताई पाटील, ज्योतीताई बोरसे, अनिताताई जाधव, साक्षी पैलवान, इरफान शेख इस्माईल, छाया माहेश्वरी, आशा भुजंग, प्रतिभा पाटील आदी कर्तबगार महिलांचा सत्कार वैशालीताई सुर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी वैशाली सुर्यवंशी म्हणाल्या की, आपण इतक्या मोठ्या संख्येने कार्यक्रमाला आल्यामुळे आनंद झाला आहे. हळदी-कुंकू हे आपल्या स्त्रीत्वाचे आणि संस्काराचे प्रतीक आहे. यानिमित्ताने आपली विचारांची देवाण-घेवाण होते. प्रेम व जिव्हाळा वाटला जातो हे या कार्यक्रमाचे निमित्त होते. या कार्यक्रमात आपल्या कुटुंबाच्या आधारवड झालेल्या स्त्री कर्तृत्वाचा सन्मान केला असून त्यांचे अभिनंदन करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते. महिलेस प्रत्येक पावलावर संघर्ष करावा लागतो. तिला संपूर्ण कुटुंबाची काळजी घ्यावी लागते. हे अजिबात सोपे नाही. मात्र महिलेने तिच्यातील शक्तीचे व दुर्गेचे रूप दाखवावे लागते. आजची स्त्री ही पुरूषांच्या बरोबरीने आणि अनेक ठिकाणी पुरूषांपेक्षा अधिक वेगाने पुढे जात आहे. शिकलेली बाई ही जगाला पुढे नेत असते.
वैशाली सुर्यवंशी पुढे म्हणाल्या की, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा वसा घेऊन मी पुढे चालली आहे. प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेला पाचोरा तर चार तारखेला भडगावात मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात येते. माझ्या वडिलांच्या विचारांचा व तत्वाचा वारसा पुढे घेऊन जात असून विकासाची मशाल प्रज्ज्वलीत ठेवण्यासाठी आपली साथ आवश्यक , असे आवाहन त्यांनी केले.
होम मिनीस्टरची मुख्य स्पर्धा
तोंडाने फुगा फुगवून तो आधी फोडण्याचे आव्हान देण्यात आले. यातील विजेत्यांना अनुक्रमे एलईडी टिव्ही, पिठाची गिरणी, गॅस शेगडी, मिक्सर, इस्त्री आदींची बक्षीसे देण्यात आली. लक्षणीय बाब म्हणजे यातील पहिली दोन्ही बक्षिसे ज्या महिलांनी पटकावली त्या दोन्हींचे पती मयत असून त्या आपल्या संसाराचा गाडा ओढत आहेत. पारीतोषीके स्वीकारतांना अश्रू अनावर झाले. तर त्यांच्या जिद्दीला उपस्थितांनी जोरदार दाद दिली. अशा प्रकारे सुमारे चार तासापर्यंत हा कार्यक्रम चांगलाच रंगला. याला पाचोरा शहरासह तालुक्यातील हजारो महिलांनी उपस्थिती दिली.