पाचोरा : भाजप विधानसभा निवडणूकप्रमुख अमोल शिंदे यांच्यावतीने महारुद्राभिषेक सोहळा 19 रोजी मध्यान्नकाळात श्री कैलामाता मंदिरात आयोजित करण्यात आला. यावेळी अमोल शिंदे व पूजाताई शिंदे यांच्या हस्ते 11 विद्वत्त पुरोहितांच्या मंत्रोपचाराने सिहोर (मध्य प्रदेश) येथील 1 लाख 8 हजार शुद्ध व सिद्ध रुद्राक्ष अभिषेक सोहळ्याला शहरातील मान्यवर अतिथी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी 1 लक्ष 8 हजार रुद्राक्ष मणींवर लघुरुद्र अभिषेक, 1100 बेलपत्र अर्पण करण्यात आले. एक लक्ष वातींचा दीप यावेळी प्रज्वलित करण्यात आला.
शतघट द्रव्य अभिषेक हे या महारुद्राभिषेक सोहळ्याचे वैशिष्ट्य होते. शिवलीलामृत ग्रंथातील एकादश अध्यायात श्री.पराशर ऋषी यांनी वर्णन केल्याप्रमाणे शतघट म्हणजे 100 कलश द्रव्य द्वारे शिवपिंडींचे व रुद्राक्षांचे पूजन यावेळी करण्यात आले. शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न झालेल्या या रुद्राभिषेक सोहळ्यात 11 विद्वत्त पुरोहितांनी सहभाग घेतला. त्यात प्रामुख्याने श्री वैभव जोशी, श्री सतीश जोशी, श्री महावीर गौड, श्री प्रसाद डोलारे, श्री प्रसाद जोशी श्री चंद्रकांत जोशी, श्री हेमंत जोशी, श्री किशोर व्यवहारे, श्री कृष्णा डोलारे, श्री खुशाल जोशी व श्री उदय जोशी यांचे योगदान होते.
श्रावण पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या पवित्र मुहूर्तावर सिद्ध केलेले रुद्राक्ष पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील प्रत्येक बहिणींना घरपोच दिले जाणार आहेत. मतदार संघातील प्रत्येक बहिणीच्या परिवाराचे संरक्षण व्हावे, कल्याण व्हावे, प्रत्येक कुटुंबात आरोग्य व आनंद नांदावा, आणि जीवनात विजय प्राप्त व्हावा या संकल्पने अभिषिक्त केलेले रुद्राक्ष प्रत्येकाला घरपोच पुरवण्याचा संकल्प आम्ही उद्यापासून पूर्ण करू असे अमोल शिंदे यांनी म्हटले आहे.