जळगाव : विविध ठिकाणी दरोडा टाकून पाच वर्षांपासून पोलिसांना चकमा देणाऱ्या प्रथमेश उर्फ डॉन प्रकाश ठमके (२४, रा. उल्हासनगर, जि. ठाणे) याला जळगाव येथे सिंधी कॉलनीतून एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉनचा अडीच कि.मी. पाठलाग करून पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीने पकडले. ही कारवाई शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता केली.
प्रथमेश ठमके हा ठाणे व पालघर परिसरात मोठमोठे दरोडे टाकून फरार व्हायचा. त्याच्यावर दरोड्यासह इतर वेगवेगळे १६ गुन्हे दाखल आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ठाणे, पालघर पोलिसांसह राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे पोलिस त्याचा शोध घेत होते. प्रथमेशचे काही नातेवाईक जळगावात राहतात. त्यामुळे तो जळगावात आला असून, सिंधी कॉलनीत असल्याची माहिती जळगाव एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, रुपाली महाजन, जिल्हा विशेष शाखेचे सहायक फौजदार दिनेश बडगुजर, पोकों अमित मराठे, पोलिस नाईक जुबेर तडवी हे सिंधी कॉलनीत पोहोचले.
त्या ठिकाणी पोलिसांना पाहून प्रथमेशने पळ काढला. त्यावेळी वरील पथकाने त्याचा अडीच कि.मी. पळत जाऊन पाठलाग केला व त्याला जिल्हा पेठ पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्याला ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक रुपाली पोळ यांच्या ताब्यात दिले आहे.