पाणीटंचाईच्या झळा सहन करणाऱ्या निमडाळे ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात मिळाला दिलासा !

धुळे : कमी पर्जन्यमानामुळे काही दिवसांपासून पाणीटंचाईच्या झळा सहन करणाऱ्या निमडाळे येथील दहा हजारांवर ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात दिलासा मिळाला आहे. खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी सततचा पाठपुरावा करत अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याद्वारे आवर्तनातून निमडाळेतील शिपाई तलाव भरून घेतल्याने उन्हाळ्यातील निमडाळेकरांचा पाणीटंचाईचा प्रश्न सुटला आहे. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी आज सकाळी शिपाई तलावात जलपूजन करत ग्रामस्थांची तहान भागविणाऱ्या खासदार डॉ. भामरे यांचे आभार मानले आहेत.

यंदा कमी पावसामुळे निमडाळे ग्रामस्थांना तीन महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांना चक्क २० ते २५ दिवसांनंतर पाणी मिळत होते. याबाबत निमडाळेचे सरपंच सुधाकर सैंदाणे, उपसरपंच नितीन सूर्यवंशी, भाजपचे तालुका सरचिटणीस शरद पाटील, ग्रामस्थांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे कैफियत मांडली. त्याची गांभीर्याने दखल घेत खासदार डॉ. भामरे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यासह पाटबंधारे व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची गेल्या सहा जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. तीत अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याद्वारे निमडाळे येथील शिपाई तलाव भरण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर खासदार डॉ. भामरे यांनी तातडीने अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याद्वारे निमडाळेतील शिपाई तलाव भरण्याची कार्यवाही करावी व निमडाळेकरांना पिण्यासाठी पाणी द्यावे, अशी सूचना केली.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवर्तनाचे निर्देश

या सूचनांनुसार जिल्हाधिकारी गोयल यांनी ३१ जानेवारीला अक्कलपाडा प्रकल्पातून डाव्या कालव्याद्वारे निमडाळेचा शिपाई तलाव भरण्यासाठी आवर्तन सोडण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाला दिले. त्यानुसार त्याच दिवशी डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात आले. चार फेब्रुवारीला निमडाळे येथील शिपाई तलावात पाणी पोहोचले. आठ फेब्रुवारीला आवर्तन बंद झाले. त्यातून निमडाळेच्या शिपाई तलावात सुमारे ४० ते ५० टक्के जलसाठा झाला असून, हा सर्व साठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. या जलसाठ्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत निमडाळेकरांची तहान भागणार असल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पदाधिकारी-ग्रामस्थांकडून जलपूजन

दरम्यान, शिपाई तलावात जलसाठा झाल्यानंतर आज भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष रवंदळे-पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, पक्षाचे तालुका सरचिटणीस शरद पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य तथा माजी अध्यक्ष सुधीर जाधव, जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, पदवीधर आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. रवींद्र निकम, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विद्याधर पाटील, निमडाळेचे सरपंच सुधाकर सैंदाणे, केतन सूर्यवंशी, पवन सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थांनी जलपूजन केले. यावेळी पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता विशाल घोडे, कनिष्ठ अभियंता बी. एस. राणे, वैभव गाडेकर, गिरीश महाले, तेजस बडोगे, जयेश सगळे यांच्यासह कर्मचाऱ्यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला.

 

इतरांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये!

निमडाळे येथे तीन महिन्यांपासून उद्‌भवलेल्या पाणीटंचाईच्या मुद्द्यावर खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पाटबंधारे व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची चार वेळा बैठक घेत निमडाळे येथील शिपाई तलाव भरून घेण्यासाठी सतत पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्यामुळेच शिपाई तलाव भरला असून, ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. यामुळे अक्कलपाडा प्रकल्पातून आवर्तनासह निमडाळेकरांची तहान भागविण्याचे श्रेय इतर कुणही घेऊ नये, असे ठणकावत ग्रामस्थांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. भामरे यांचे जाहीर आभार मानले.