पारंपारिक वेषभूषा अन् लोक गीत; पहूरमध्ये संत सेवालाल जयंती उत्साहात

पहूर ता. जामनेर :  येथील आर.टी. लेले विद्यालयात बंजारा समाजाचे आराध्य दैवत क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थीनींनी बंजारा समाजातील महिलांचे पारंपारिक वेषभूषा असलेला पेहराव परिधान केला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. व्ही. पाटील होते. प्रमुख पाहूणे म्हणून बंजारा समाजाचे पिंपळगाव कमानी तांड्याचे उपसरपंच संदीप राठोड, तुकाराम चव्हाण उपस्थित होते.

तत्पूर्वी  संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी इ. ११ वी विद्यार्थीनी लक्ष्मी रमेश नाईक ,सीता परशुराम राठोड,पुजा विनोद राठोड व राणी ज्ञानेश्वर चव्हाण या विद्यार्थीनींनी बंजारा समाजातील महिलांची पारंपारिक वेषभूषा करीत अभिनय सादर केला.

बंजारा समाजातील संत सेवालाल यांच्या जीवन चरित्रावरील लोकगिते तसेच नृत्य सादर केले.प्रसंगी तुकाराम चव्हाण,शिक्षक विजय बोरसे, ,आर टी देशमुख,मधुकर आगारे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक एस व्ही पाटील यांनी संत सेवालाल यांच्या जीवन चरित्राला उजाळा दिला. यावेळी शाळेतील शिक्षक ,शिक्षिका ,कार्यालयीन कर्मचारी ,विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष भडांगे यांनी तर आभार रमेश देशमुख यांनी मानले.