पारोळा : तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. मोंढाळे प्र.अ.,हिवरखेडे येथे शेतशिवारात जावून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत शेतकऱ्यांशी सवांद साधला.
नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पारोळा तहसील कार्यलयात अधिकारी वर्गाची आढावा बैठक घेत सूचना केल्या. जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, पुढील ४८ तासांत पंचनामा पूर्ण करा. कोणतेही बाधित क्षेत्र, बाधित गट किंवा शेतकरी सुटणार नाही याची खात्री करा. घरांचे छत, सौर पॅनेल आणि पॉलीहाऊस यांचे नुकसान झाले असल्या अश्या नुकसानीचा पंचनामा करा. मोबाईल नंबर आणि आधार तपशील गोळा करा जेणेकरून शासनाकडून मंजूरी मिळाल्यानंतर भरपाईचे वितरणाला विलंब होणार नाही.
ज्या शेतकऱ्यांकडे पीक विमा आहे, त्यांच्यासाठी नागरिक सेवा केंद्र, ग्रामपंचायत, ग्राम रोजगार सेवक आणि कोतवाल यांना शेतकऱ्यांना नुकसानीबाबत विमा कंपनीला माहिती देण्यासाठी मदत करण्याच्या सूचना निर्गमित करा. विमा कंपनीसोबत बैठक घ्या आणि त्यांचे मूल्यांकन वेळेत पूर्ण झाले असल्याची खात्री करा. त्यांना हवामान केंद्राचा डेटा प्रदान करा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत तहसील आणि हवामान-आधारित विमा जुळत असलेल्या नुकसानीचे मूल्यांकन सुनिश्चित करा. कोणतीही तक्रार नसावी.
खरीप हंगामापूर्वी वेळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी कालावधीचे पीक घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. जेणेकरून आर्थिक बाजू भक्कम करता येईल.
शेतमजुरांना रोजगार मिळावा यासाठी मनरेगा अंतर्गत कामे सुरू करण्यात यावी, कारण पीक नुकसानीमुळे त्यांचा रोजगार गेला आहे. त्यांना आधार मिळेल अश्या सूचना वजा आदेश जिल्हाधिकारी प्रसाद यांनी अधिकारी वर्गाला दिल्या.
यावेळी प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड, तहसीलदार डाँ. उल्हास देवरे, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, कृषी अधिकारी दमाळेसह विविध अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांचे कौतुक
पारोळा तालुका हा सर्व कार्याच्या बाबतीत जिल्ह्यात १ नंबरला आहे. तहसीलदार डाँ. उल्हास देवरे उत्तम कार्य करीत आहेत. त्यांच्यामुळे तालुका कोणत्याही बाबतीत मागे नाही. अश्या शब्दांत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तहसीलदार डाँ. देवरे यांचे कौतुक केले. दरम्यान तहसीलदार डाँ. देवरे यांनी आचारसंहिता पूर्वी केलेल्या कामाची माहिती देतांना संजय गांधी योजना, पुरवठा विभागाचे आधार सीडीग, निवडणूक विभाग मतदान पडताळणी बाबत सविस्तर माहिती दिली.