पारोळ्यात शोभायात्रेत ‘हिंदू’ विराट शक्तीचे दर्शन

पारोळा : सियावर प्रभू श्रीरामचंद्र की जय..जय-जय श्रीराम यासारख्या असंख्य हिंदुत्ववादी जयघोषचा निनाद बॅण्ड, डिजेतून निघणारी रामधून, फटाक्यांची आतषबाजी अन प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या ओतप्रोत आनंदात न्हाऊन निघालेले बेभान रामभक्तांच्या मांदियाळीतून हिंदू विराट शक्तीचे दर्शन घडले.

शहरातील अध्यात्मिक तीर्थक्षेत्र भवानी गडावर प्रभू श्रीराम यांची महाआरती विश्वस्त डाँ. मंगेश तांबे यांच्यासह मान्यवरांनी करीत शोभायात्रेला सुरुवात ४ वाजता करण्यात आली. आझाद चौक, चंद्रमा चौक, कासार गणपती चौक मार्गे मोठे श्रीराम मंदिरात महाआरतीने शोभयात्रेची सांगता झाली. दरम्यान ठिकठिकाणी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करीत जंगी स्वागत करण्यात आले. टायगर इंटरनॅशनल स्कुलचे विद्यार्थी बग्गीत प्रभू श्रीराम, माता सीता, श्री लक्ष्मण, श्री हनुमान यांच्या भूमिकेत विराजमान होते. शाही पद्धतीने निघालेली ह्या शोभायात्रेने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी संघचालक मुकेश चोरडिया, डाँ. संभाजीराजे पाटील, कैलास चौधरी, अमृत चौधरी, राजू कासार, गोपाल अग्रवाल, केशव क्षत्रिय, धीरज महाजन, मुकुंदा चौधरी, रवींद्र पाटील, सचिन गुजराथी, रवींद्र पाटील, लक्ष्मण महाले, सचिन शिनकर यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष ऍड कृतिका आफ्रे यांच्यासह महिला मंडळ मोठ्या संख्येने सहभागी होते.

श्रीरामधूनवर थिरकले लोकप्रतिनिधी

प्रभू श्रीराम सुमारे ५०० वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येत भव्य मंदिरात विराजमान झाले. प्राणप्रतिष्ठा सोहळा संपूर्ण देशाने याची देही याची डोळा पहिला. त्यामुळे देशभरात आनंदनाचे उत्साहाचे वातवरण निर्माण झाले. विविध कार्यक्रमातून-उपक्रमातून हा आनंद व्यक्त करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत रामधूनवर माजी खा. ए. टी. पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी नगराध्यक्ष करण पाटील, चंद्रकांत पाटील, गोविद शिरोळे, सुरेंद्र बोहरा, उपनगराध्यक्ष डाँ. मंगेश तांबे, प्रवीण दानेज यांनी थिरकत आनंद व्यक्त केला.

विविध मंदिरावर राम भक्तीचा जागर

शहरातील श्री भवानी गड, श्री बालाजी मंदिर, श्री राम मंदिर, सिद्धेश्वर महादेव मंदिर, सोमेश्वर महादेव मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, पुरातन छोटे श्री राम मंदिर सह विविध मंदिरावर श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. महाआरती लघुरुद्रभिषेक, सुंदरकांड भजन सध्यातून श्री राम भक्तीचा जागर करण्यात आला. विविध मंदिरावर महाप्रसाद वाटप करण्यात आला. विद्युत रोषणाईने सर्वच मंदिरे उजळली होती.