पालकमंत्री गुलाबराव पाटील चुकलेच…!

तरुण भारत लाईव्ह न्यूज । चंद्रशेखर जोशी  । शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अनेक ठिकाणी ‘वज्रमूठ सभा झाल्या. जळगाव जिल्ह्यात मात्र ‘वज्रमूठ’ सोडून एकमेकांचे केवळ बोट धरून या पक्षाचे नेते दाखल झाले आहेत. या दोऱ्यापूर्वी सुरू झालेले रणकंदन, आरडाओरड आणि किंकाळ्या… जळगाव जिल्ह्यात फार परिणामकारक ठरणार आहेत काय ? तर याचे उत्तर नकारात्मकच येईल, यात कुणालाही शंका नसावी… कारण यापूर्वीदेखील अनेक वेळा उद्धव ठाकरे हे जिल्ह्यात येऊन गेले. पूर्वी त्यांच्या पक्षाचे उमेदवार हे पक्षाच्या चिन्हामुळे नाही तर त्यांच्या कर्तृत्वामुळे निवडून आले आहेत. त्यामुळे आलेल्या कुणाला किती किंमत द्यायची हे ठरविणे आवश्यक असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सभेत बोला, मात्र वाटेल तसे आरोप करणार असाल तर सभेत घुसू असा सज्जड दम भरला आणि या पाठोपाठ अनेक ‘वाचाळवीर’ जागे झाले. आव्हानांवर आव्हाने सुरू झाली आहेत.

राज्यातील सद्य:स्थिती लक्षात घेता सत्तेसाठी वाटेल ते करण्याची तयारी विरोधी पक्षातील नेते मंडळींकडून सुरू असल्याचे लक्षात येते. जळगाव जिल्ह्यात फारशी वेगळी परिस्थिती आहे असे नाही. पूर्वी म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पाच उमेदवार विजयी झाले. विजयी झालेले हे पाच जण पक्षापेक्षा स्वकर्तृत्वावर विजयी झाले हे तेवढेच खरे. गुलाबराव पाटील यांचेच उदाहरण बघा ना…. या मतदारसंघात त्यांच्याविरूद्ध राष्ट्रवादीने दंड थोपटले होते, अन्य पक्षांचाही छुपा गनिमी कावा सुरू होता, पण त्यावर मात करत गुलाबरावांनी बाजी मारली.

पारोळा-एरंडोल विधानसभा | मतदारसंघ असा आहे की तेथे एकदा डॉ. सतीश पाटील विजयी झाले तर दुसऱ्या वेळी हमखास चिमणआबा विजयी होतात, हे ठरलेले. जणू दोघांनी पाच-पाच वर्षे वाटून घेतली, अशी येथे परिस्थिती पाचोऱ्यात किशोर आप्पांना फारसा विरोध नाही, एका पुण्याईवर ते विजयी ठरत आले आणि आता त्यांनीही चांगला जम बसविला आहे.

चोपड्यातही अन्य पक्षांकडून बाहेरील उमेदवार लादला गेला म्हणून लता सोनवणे यांनी अगदी शेवटच्या क्षणी बाजी मारली. पूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख असलेले चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगर मतदारसंघातून विजयी झाले. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना विरोध म्हणून सर्व पक्ष त्यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या पाठीशी आले व ते अपक्ष असले तरी त्यांना चांगले मतदान झाले व ते विजयी ठरले. हा गोषवारा अशासाठी की केव्हाही कुणाला किती किंमत द्यायची हे ठरविणे आवश्यक असते. अजितदादाच बघाना… कसे म्हणतात ‘कोण राऊत मी ओळखत नाही…! याच पद्धतीची अनेक उदाहरणे आहेत. प्रत्येक गोष्टीत शिवसेना स्टाईल’ चालत नाही… हेच खरे… सभेत घुसण्याच्या इशाऱ्याने अनेक ‘वाचाळवीर’ जागे झाले आहेत. कोणी ५० हजारांचे आव्हान देतेय…कोणी म्हणते शिरूनच दाखवा….  बाहेर कसे पडता ते बघतो…. आव्हानांना प्रतिआव्हान दिले जातेय… मग त्यात किती दम हे त्यांनाच ठाऊक जनता आता हुशार झाली आहे… ती कामांना महत्व देते….. ज्यांची कामेच नाही… किंवा तशी कुवतही नाही ते आव्हानांपलीकडे काही देऊ शकत नाही, हे लक्षात घेणे गरजेचे असून त्यामुळेच गुलाबभाऊ असे आव्हान देऊन तुम्ही चुकलेच… असे म्हणावे लागते आहे.