पालेभाज्यांचे भाव गगनाला; गावरान गवार शंभर रुपये किलोंवर

तरुण भारत लाईव्ह । ७ ऑक्टोबर २०२३। गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे पालेभाज्यांसह कोथिंबिरीला फटका बसला आहे त्यामुळे आवक कमी झाल्याने भाव गगनाला भिडले आहेत. दहा रुपयांवर आलेला टोमॅटो ही आता महागाईच्या तराजूत  जाऊन बसला आहे.

आवक अत्यल्प असल्याने यंदाच्या हंगामातील सर्वाधिक भाग गावरान गवारला मिळताना दिसत आहे.  गेल्या महिन्यात सलग चार पाच दिवस पारोळा, एरंडोल, धरणगाव, भडगाव, चोपडा ,अमळनेरसह जळगाव,  तालुक्यात पाऊस झाला त्याचा फटका पालेभाज्यांना बसला. तर काही पालेभाज्या पाण्यातच सडल्या त्यामुळे उत्पन्नात घट झाली

अशातच  पितृपक्ष आला आणि त्यामुळे भाज्यांची मागणी वाढली. त्यामुळे कोथिंबीर सह सर्वच भाज्यांचे दर ६० ते २०० रुपये किलो पर्यंत गेले आहेत. तर टोमॅटो गेल्या महिन्यात शंभर रुपयांवर गेला होता त्यानंतर टोमॅटोला स्वस्ताचा रंग चढला अवघ्या दहा रुपयांवर टोमॅटो आला मात्र गेल्या दोन दिवसांपासून टोमॅटोला महागाईचा रंग चढताना दिसत आहे.