जळगाव : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दीपस्तंभ फाऊंडेशनच्या मनोबल प्रकल्पाला भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधला. याप्रसंगी दोन्ही हात नसलेली विद्यार्थिनी लक्ष्मी शिंदे हिने त्यांचे औक्षण केले. याबद्दल फडणवीस यांनी हृदयस्पर्शी पोस्ट लिहली आहे.
यावेळी भावुक झालेल्या फडणवीस यांनी ट्विट करत या प्रसंगाने आपल्या डोळ्यात पाणी आल्याचं सांगितलं. फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की,आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा… हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच. कारण पायाच्या अंगठ्यानं टिळा लावणाऱ्या, त्याचं पायानं आरतीचं तबक ओवाळणाऱ्या, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं. तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की “तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे.” ते पाहून मी इतकंच म्हणालो, “ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत.” या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले . “अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!” या कवितेच्या ओळी लिहित त्यांनी हृदयस्पर्शी ट्विट केलं आहे. यावेळी फडणवीस यांच्या सोबत इतर मंत्री आणि आमदारांची उपस्थित होते.