मुंबई : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला असून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, पुण्यासह बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची हजेरी लागेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मुंबईसह पालघर, ठाणे या जिल्ह्यांसाठी मंगळवारी आणि बुधवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. रायगडसाठी पुढील चारही दिवस, तर रत्नागिरीसाठी मंगळवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. तसंच सिंधुदुर्गात मंगळवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. मध्य महाराष्ट्रातही पुढील ४८ तास मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून हे क्षेत्र उत्तर ओडिशा आणि झारखंडच्या दिशेने प्रवास करत आहे. तसंच महाराष्ट्राच्या किनार्यापासून कर्नाटकच्या किनार्यापर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. ईशान्य अरबी समुद्रात चक्रीय वात स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मान्सून सक्रिय राहणार असून महामुंबई परिसरात सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.