छत्रपती संभाजीनगर : यंदा मान्सून कधी दाखल होणार याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनीही पावसाबाबतच अंदाज वर्तविला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात एका कार्यक्रमासाठी पंजाबराव डख आले असता त्यांनी आपल्या अभ्यासानुसार यंदा चांगल्या प्रकारे पाऊस पडणार असल्याचे सांगितले. शेतकर्यांनो, शेती मशागतीची कामे वेळेत उरकून घ्यावीत, मान्सूनचे आगमन लवकरच होणार आहे, असे आवाहन देखील पंजाबराव डख यांनी केले आहे.
यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मान्सूनकडे राज्यभरातील शेतकर्यांचे लक्ष लागले आहेत. विशेष म्हणजे गेल्यावर्षी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात मोठ्याप्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठं नुकसान झालं. मार्च, एप्रिल ते मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे गेल्यावर्षी शेतकर्यांच्या हातात काहीच आले नाही. त्यामुळे यावर्षी पाऊस चांगला पडावा, अशी अपेक्षा शेतकर्यांना लागून आहे.
पावसाबाबतचा अंदाज वर्तवितांना पंजाबराव डख म्हणाले की, येत्या २२, २३, २४ मे रोजी मान्सूनपूर्व पाऊस पडणार असून, जून महिन्याच्या १, २, ३ तारखेला देखील पाऊस पडणार असल्याचे डख म्हणाले. तर ८ जून रोजी महाराष्ट्रात मोसमी पावसाची दमदार हजेरी लावून यंदा चांगल्या प्रकारे पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्यांनी शेतीच्या मशागतीसाठी थोडे दिवस राहिले आहेत. त्यांनी लवकरात लवकर शेतीच्या मशागतीची कामे करून खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज राहावे, असेही पंजाबराव डख म्हणाले.