अडावद, ता.चोपडा : संपूर्ण जिल्हाभरासह येथील परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे भाजीपाला पिकांची मोठी हानी झाली आहे. यामुळे भाजीपाला पिकांवर विपरित परिणाम होवून उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमी झाली आहे. या कारणांनी सध्या पालेभाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. अशातच मात्र नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चक्रीची (भोपळा) बाजारात मोठ्याप्रमाणात आवक वाढली असल्यामुळे चक्रीचे भाव कमालीचे गडगडल्याने चक्री उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळत नसल्याने आधीच बळीराजा आर्थिक संकटांचा सामना करित आहे. अशातच दिवसेंदिवस बी- बियाणे, रासायनिक खते, फवारणीची औषधे यांचे भाव कडाडल्यामुळे व मशागतीचा अतोनात खर्च वाढल्यामुळे आंतर पिकातून मिळालेल्या चार पैशांतुन पुढील पिक घेण्यासाठी बळीराजा नियोजन करित असतो. त्यासाठी मृगाच्या सरी कोसळण्याआधीच १५ दिवस अगोदर मे महिन्यात लावणी केलेली चक्री अवघ्या अडीच ते तीन महिन्यात शेतकऱ्यांच्या हाती थोडाफार पैसा उपलब्ध करुन देते. त्यामुळे खर्च भागविणाऱ्या नगदी पिक म्हणून अडावद सहपरिसरात भाजीपाला उत्पादक शेतकरी चक्रीची मोठ्या प्रमाणात लागवड करतात.
सध्या बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्यामुळे सरासरी १० ते १५ रुपये किलो दराने विकली जाणारी चक्री किरकोळ दराने अवघ्या ५ रुपये किलोने तर घाऊक बाजारात अवघ्या अडीच ते तिन रुपये किलोने विकली जात आहे. यामुळे उत्पादन खर्चही न निघत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्राहीमाम म्हणण्याची वेळ आली आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह जवळच्या राज्यांमध्ये मोठया प्रमाणावर निर्यात होणाऱ्या रुचकर, स्वादिष्ट, हवीहवीशी वाटणाऱ्या चक्रीने मात्र शेतकऱ्यांना चक्रावून सोडले आहे. अतोनात पैसा खर्च करुन या उत्पादनातून हाती फक्त भोपळाच येत असल्याने चक्रीला अक्षरशः गुरढोरांपुढे टाकण्याची वेळ शेतकऱ्यांपुढे येवून ठेपली आहे. परंतु सद्यस्थितीत समाधानकारक भाव मिळत नसल्याने चक्रीमुळे चक्कर येण्याची आपत्ती बळीराजावर आली आहे.