पावसाळा आता ४५ दिवसच, हतनूरमध्ये ४६ टक्के जलसाठा; काय आहे नियोजन?

भुसावळ : पावसाने ओढ दिल्यानंतर शेतकऱ्यांची चिंता वाढली असून दुसरीकडे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने दडी मारल्यानंतर सोमवारी दुपारी १२ वाजता धरणाचे चार दरवाजातून होणारा विसर्ग थांबवण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास धरणात ४६ टक्के जलसाठा होता तर २११.५३० मीटर इतकी जलपातळी होती. हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात गेल्या पंधरवड्यापासून पाऊस नसल्याने धरणातील आवक मंदावली आहे. यामुळे हतनूर प्रशासनाने धरणातून होणारा विसर्ग थांबवला आहे. रविवारपर्यंत धरणाचे दोन दरवाजे एक मिटरने तर दोन दरवाजे अर्धा मिटरने उघडून विसर्ग करण्यात आला होता मात्र पावसाअभावी आवक नसल्याने सोमवारी दुपारी १२ वाजता खुले असलेले दरवाजे बंद करुन जलपातळी वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. यंदा हतनूरच्या पाणलोट क्षेत्रातील पावसात गेल्या वर्षाच्या तुलनेत एक हजार ५३ मिली पावसाची तूट आहे.

ऑक्टोबरपर्यंत धरण भरण्याचे नियोजन
हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात यंदा तीन हजार २५३ मिली पाऊस झाला तर गतवर्षी तो चार हजार ३०६ मिली होता. गतवर्षाच्या तुलनेत यंदा एक हजार ५३ मिली पाऊस कमी झाला आहे. सुमारे २० दिवसांपासून तापी व पूर्णा नदीच्या पाणलोटक्षेत्रात पावसाचा पत्ताच नाही तर धरणात येणारी दररोजची पाण्याची आवक कमी झाल्याने पूर नियंत्रणाच्या नियमांनुसार २१ ऑगस्टपर्यंत धरणात ४६ टक्के जलसाठा करणे अपेक्षीत होते. भविष्यात पाणलोटक्षेत्रात पावसाने दडी मारली तरी १० ऑक्टोबरपर्यंत १०० टक्के जलसाठा पूर्ण करता यावा, यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे.

शेतकरी ‘दुष्काळाच्या छायेत ; खरीप पिके संकटात
भुसावळ : भुसावळ तालुक्यात यंदा अत्यल्प पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. ऑगस्ट महिन्यात केवळ ५० ते ५२ मिलिमीटर पाऊस पडल्याने खरीपाच्या पिकांची वाढ खुंटली आहे. भुसावळ तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या छायेत वावरत आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र डोळे मिटून हा प्रकार बघत आहे. तालुक्यात आतापर्यंत कृत्रिम पाऊस पाडून पिकांना जीवदान देणे गरजेचे होते मात्र अद्यापही लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून कुठलीही तजवीज होत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

पावसाचे उशिराने आगमन
यंदा पाऊस उशिराने सुरू झाला. जून महिन्यात होणारी पेरणी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाली. त्यावेळी ही पेरणी ही किरकोळ पावसावरच शेतकऱ्यांना करावी लागली जुलै महिन्यात काही प्रमाणात पाऊस पडत राहिला त्यामुळे पिके तरारली मात्र पुन्हा ऑगस्ट | महिन्यात पावसाने तब्बल वीस दिवस दांडी मारली. भुसावळ विभागात हवामान विभागाची भुसावळ, वरणगाव, कुऱ्हेपानाचे व पिंपळगाव या चार केंद्रावर पावसाचे नोंदणी होते. ऑगस्ट महिन्यात तब्बल २० दिवस पावसाने दडी मारली आहे. उर्वरीत दहा दिवस पाऊस पडला असला तरी तोही केवळ दोन किंवा तीन मिलीमीटर पाऊस त्यामुळे काही विभागात तर काही विभागात पाऊस नाही, असे चित्र आहे. महिनाभरात ५२.५ मिलिमीटर पाऊस काही विभागात पडला.

कृत्रिम पावसाची गरज !
काँग्रेस प्रशासन काळातच देशात कृत्रिम पाऊस पडण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. यापूर्वी बऱ्याच वेळेस कृत्रिम पाऊस पाडण्यात आला आहे. यावर्षीही कृत्रिम पाऊस पडण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. जिल्ह्याला एक नव्हे तर तीन मंत्री लाभले आहे मात्र अद्यापही कृत्रिम पाऊस पडण्याच्या कोणत्याही हालचाली दिसून येत नाही. शेतकरी संकटात सापडला असतानाही लोकप्रतिनिधी व प्रशासन निद्रावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. शासन व प्रशासनाने या संदर्भात त्वरित निर्णय घेऊन भुसावळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. ■ पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर उत्पादन येण्याची आस मावळली आहे.